रमेश कुलकर्णी
भारतीय वनसंपदा आणि वन्यजीवनासारखे वैविध्य जगात कुठेच नाही, अशी ठाम भूमिका घेणारे 'पद्मश्री' मारुती चितमपल्ली (Padmashri Maruti Chitampalli) यांना आता कुठे शोधायचे? सरकारी उच्चपदस्थ वन अधिकारी असतानाही त्यांनी जपलेली सहृदयता अलीकडे दुर्मीळ होत चालली आहे. विदर्भाशी त्यांची घट्ट नाळ जोडली गेली होती. विदर्भाच्या जंगलातच त्यांना आयुष्याचा खरा अर्थ उलगडला, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वन्यसृष्टीचा अभ्यास हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास बनला होता. त्यातून वन्यसृष्टीच्या अचंबित करणाऱ्या वैशिष्ट्यांची जगाला नव्याने ओळख झाली. मनुष्याला निसर्गाच्या जवळ आणून जोडणारा अनोखा दुवा म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. वनसंपदेची मुळातच आवड, त्यातील गाढा अभ्यास आणि सूक्ष्म निरीक्षणाला अनुभवाची जोड मिळाल्याने साहित्यातील 'हिरवी वाट' ते सहजपणे फुलवू शकले. चितमपल्ली हे फुलविण्याचा ध्यास घेतलेले साहित्यिक होते. त्यांना वृक्षांचा लळा होता. त्यांची गावकऱ्यांसोबतची दोस्ती चौकटीपलीकडची होती. आदिवासी बांधवांनी त्यांना जंगलांचे खाचखळगे दाखविले. चितमपल्ली यांनी गावकऱ्यांची निर्मळ निसर्गमाया जगभर नेली.
विदर्भ हीच त्यांची कर्मभूमी राहिली. कोईम्बतूर येथील महाविद्यालयात वनशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वनविभागाची नोकरी आपसूकच त्यांनी स्वीकारली. विदर्भातील नवेगावबांध येथे १९७० ला नोकरीच्या निमित्ताने आलेला हा अवलिया नंतर अवघ्या विदर्भाचा होऊन गेला. अरण्यपुत्र माधवराव पाटील डोंगरवार हा वनसखा त्यांना तिथेच गवसला. विदर्भाच्या मातीशी जुळलेली नाळ कालांतराने अधिक घट्ट होत गेली. विदर्भाच्या मातीवर, आकाशावर आणि प्रामुख्याने येथील वनसंपदेविषयी त्यांना प्रचंड ममत्व होते. जंगलातील पानाफुलांशी, पशुपक्ष्यांशी त्यांची अतूट मैत्री झाली. विदर्भाच्या माती, पाणी आणि वाऱ्याशी झालेल्या रोजच्या सहवासाने त्यांना साहित्याचा गंध दिला. या गंधाने त्यांना सतत प्रफुल्लित ठेवले. ही प्रफुल्लता त्यांच्या साहित्यात सापडायची. ती लोकांना आवडायची. त्यांच्या निसर्गायनात पाऊल ठेवलेल्या वाघ, वानर, अस्वल, कासव आणि हरणांच्या कळपांना त्यांनी सोप्या साहित्यवाटेवर आणून ठेवले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य तथा नवेगाव राष्ट्रीय उद्यान प्रकल्पांच्या जडणघडणीत व विकासात त्यांचे योगदान मोलाचे होते.
विदर्भात सरकारी वन अधिकारी म्हणून झालेले त्यांचे आगमन त्यांनीच फक्त नोकरीपुरते मर्यादित ठेवले नाही. अपार जंगलभ्रमंतीमुळे 'अरण्यऋषी' हे संबोधन त्यांना कायम चिकटले. मारुती चितमपल्ली यांच्याकडे बारीकसारीक अनुभवाचा साठा होता. प्रत्येक गावाने आपल्या परिसरात चिंचेचे झाड लावावे, हा त्यांचा आग्रह असायचा. त्यामागचे शास्त्रीय कारणही ते उलगडून सांगायचे. चिंचेच्या झाडात अर्थिंग कॅपिसिटी असते. चिंचेचे झाड विजेला खेचून घेते, त्यामुळे गावात इतरत्र वीज पडण्याचा धोका कमी होतो. पावसात वीज कडाडताना चिंचेच्या झाडाखाली आडोसा शोधू नये हे सरळ साध्या भाषेत प्रत्येकाला समजावून सांगितले. जैवविविधता तज्ज्ञ ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. पशुपक्षी तथा रानातील वनस्पतींच्या उपयोगितेबद्दलचे संदर्भज्ञान आदिवासींच्या मैत्रीने त्यांच्याकडे सोपविले होते. अनौपचारिक गप्पांमध्ये रानावनातील गूढ कथा आणि त्यामागची पार्शवभूमी रंगविताना ते तल्लीन होऊन जायचे.
पर्यावरण प्रेम आणि निसर्गाशी नाते जपणारा हा थोर साहित्यिक आपल्या लिखाणातून वाचकांना निसर्गाच्या समीप घेऊन गेला. 'पक्षी जाय दिगंतरा', 'केशराचा पाऊस', 'रातवा ते चकवा चांदणं' अशा जवळपास २० पुस्तकांचा रान साहित्यमेवा त्यांनी वाचकांना दिला. त्यांना १३ भाषा अवगत होत्या. पक्षिकोश, वृक्षकोश, प्राणिकोशांची निर्मिती करणारा हा शब्दभंडारी जनसामान्यांचा शब्दकोश समृद्ध करून गेला. विपुल साहित्यदान दिल्यानंतरही या ज्ञानयोग्याने स्वतःला अहंतेचा स्पर्श होऊ दिला नाही. रात्री-अपरात्री जंगल तुडवीत अवकाशाचे अवलोकन करणारा हा वन्यजीव संशोधक कायम जमिनीवर राहिला. मायमराठीला हजारो नवशब्दांचे दान देणारे किमयागार म्हणून ते सदैव आठवणीत राहतील. अख्खे आयुष्य विदर्भाच्या रानावनात काढलेल्या या मराठी सारस्वताला वृद्धावस्थेमुळे नाइलाजास्तव नागपूरहून सोलापूरला जावे लागले. निवडक आप्तांच्या साक्षीने त्यांना साजेसा निरोप देण्याची समयसूचकता आशुतोष राम शेवाळकरांनी दाखविली. आता तर हा अरण्यऋषी आपल्यातून कायमचा निघून गेला. रानवाटा पोरक्या झाल्या आहेत. जगण्याच्या भ्रमंतीत जेव्हा जेव्हा रानावनातील झुळूक आपल्यापर्यंत येईल, तेव्हा तेव्हा निसर्गवेड्या मारुती चितमपल्ली यांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.
000