- देश-विदेश
- 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीची भीती'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीची भीती'
भीतीपोटीच वारंवार दौरे करीत असल्याचा संजय राऊत यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी यश संपादन करण्याच्या वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्तविक महाविकास आघाडीची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करीत आहेत, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी अभेद्य असून पंतप्रधान मोदी हे आपल्याच पक्षाच्या कामगिरीबाबत साशंक आहेत. त्यामुळे से वारंवार महाराष्ट्राचे दौरे करीत आहेत. आता पंतप्रधान पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यासाठी सर्वांना कामाला लावण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्या भरभरून लोक येत आहेत. मात्र, पोहरादेवी पंतप्रधान मोदी यांना प्रसन्न होणार नाही कारण ती नेहमीच प्रामाणिक माणसांची पाठराखण करते, असेही राऊत म्हणाले.
ठाकरे यांच्या घराणेशाहीचा भाजप लाभार्थी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे वारंवार घराणेशाहीच्या विरोधात वक्तव्य करीत आहेत. वास्तविक ठाकरे यांच्या घराणेशाहीचा भारतीय जनता पक्ष हाच लाभार्थी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या घराण्याच्या जोरावरच भाजपाने महाराष्ट्रात पाय रोवले आहेत, असा दावाही राऊत यांनी केला. ठाकरे आणि पवार घराण्याने समाजाला महाराष्ट्राला आणि देशाला खूप काही दिले आहे. त्यामुळे त्यांची घराणेशाही ही दिशादर्शक आहे, असेही ते म्हणाले.
... म्हणून जय शहा बीसीसीआयचे अध्यक्ष
गृहमंत्री अमित शहा तावातावाने घराणेशाहीच्या विरोधात बोलतात. मात्र, त्यांनी स्वतःच्या घराणेशाहीचा नीट विचार करावा. केवळ अमित शहा गृहमंत्री आहेत म्हणून त्यांचे चिरंजीव जय शहा बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. अन्यथा या पदावर यायला जय शहा यांनी १०० शतके ठोकली आहेत की ५ हजार बळी घेतले आहेत? त्यांनी वीरेंद्र सहवाग आणि विराट कोहली यांच्यापेक्षा अधिक षटकार मारले आहेत की कोणत्या क्रिकेट संघाला प्रशिक्षित केले आहे, असे सवाल करताना राऊत म्हणाले की आपण कोणाच्या घराणेशाहीबद्दल बोलतो याचे भान ठेवा.
अमित शहा पहात आहेत पंतप्रधान पदाचे स्वप्न
गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत असल्याची आपली माहिती आहे. मात्र सध्या पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी असल्याची जाणीव शहा यांनी ठेवावी. सत्तेचा सारीपाट तुमच्या इशाऱ्यावर नाचणार नाही. सध्या तुमच्याकडे सत्ता, पैसा आणि तपास यंत्रणा आहे. याच्या जोरावर तुमचा कारभार चालला आहे. मात्र, हे सर्व तुमच्याकडे नसेल तेव्हा देशात तुमची अवस्था काय असेल, याचा विचार करावा असेही राऊत शहा यांना उद्देशून म्हणाले.