- राज्य
- बारामतीत होणार काका पुतण्याची लढत
बारामतीत होणार काका पुतण्याची लढत
दादांच्या विरोधात युगेंद्र पवार उतरणार निवडणुकीच्या मैदानात
बारामती: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत काका आणि पुतण्या यांची लढत बघायला मिळणार आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. स्वतः युगेंद्र पवार यांनीच तसे सूचित केले आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्याबद्दल आपण अद्याप कोणताही विचार केलेला नाही. मात्र, मी निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा असेल तर त्याचा विचार करावाच लागेल, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीला अद्याप 90 दिवसांचा कालावधी आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासंबंधी विचार करण्यास अजून अवधी आहे, असेही ते म्हणाले
योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना युगेंद्र पवार यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली आहे. शरयू ऍग्रो या कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत. योगेंद्र पवार हे बारामती कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षही होते. मात्र, या संस्थेवर अजित पवार यांचा वर चष्मा असून नुकतेच त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे.