- राज्य
- 'शरीर संबंधास नकार, मित्रांसमोर अवमान ही क्रूरताच'
'शरीर संबंधास नकार, मित्रांसमोर अवमान ही क्रूरताच'
पत्नीचा दावा फेटाळत उच्च न्यायालयाने कायम ठेवला घटस्फोटाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी
पत्नीने पतीला शरीर संबंध ठेवण्यासाठी नकार देणे, मित्रांदेखत. वारंवार अवमान करणे, विवाहबाह्य संबंधांचा आरोप करणे ही पतीबाबत पत्नीची क्रूरताच असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पत्नीचे अपील फेटाळून लावत पुणे कुटुंब न्यायालयाचा घटस्फोट मंजूर करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
कुटुंब न्यायालयाच्या घटस्फोट मान्य करण्याच्या निर्णयाला पत्नीने आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, संबंधित महिलेची पतीशी असणारी वागणूक ही क्रूरता असल्याचा निर्वाळा देऊन न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. नीता गोखले यांच्या खंडपीठाने घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला आहे.
हे जोडपे दशकभर विभक्त राहत आहे. समुपदेशक, मध्यस्थ, कुटुंब न्यायालय आणि इतर खंडपीठ या सर्वांनी या दांपत्यामधील वाद मिटविण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, त्याला यश आले नाही. त्यामुळे आता केवळ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे नमूद करून उच्च न्यायालयाने पतीचा घटस्फोटाची मागणी करणारा अर्ज मान्य केला.