- राज्य
- 'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा'
'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा'
पंकजा मुंडे यांची शरद पवार यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका काय हे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पराभव झाला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या वातावरण निर्मितीमुळे मुंडे यांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे वंजारी समाजातील मुंडे यांना ओबीसी नेत्या मानले जाते. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पंढरपूर जवळ पूर्वी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पंढरपूर दौऱ्यात पवार यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल, असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी तीन ऑगस्ट रोजी शरद पवार पंढरपूर येथे येणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी ओबीसी संघटनांची मागणी आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण मिळावे आणि कुणबी नोंदी मिळालेल्या व्यक्तींच्या सगे सोयऱ्यांनाही आरक्षणात सामावून घेतले जावे, या मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या दोन आग्रही मागण्या आहेत. मात्र, या दोन्ही मागण्यांना ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात विशेषतः ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी समाजात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.