- राज्य
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नव्या पक्षाची स्थापना
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नव्या पक्षाची स्थापना
शरद पवारांची साथ सोडत माजी आमदाराने केली इस्लाम पक्षाची स्थापना
नाशिक: प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कास सोडून इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र अर्थात इस्लाम या पक्षाची स्थापना केली आहे. राज्यभरातील मुस्लिमबहुल मतदारसंघात हा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे.
आसिफ शेख यांचे वडील देखील काँग्रेसकडून मालेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. आसिफ शेख सन 2014 च्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती यांच्याशी काट्याची टक्कर घेऊन काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र, सन 2019 च्या निवडणुकीत मुफ्ती यांनी शेख यांचा पराभव केला. या पराभवानंतर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर शेख यांनी शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शेख यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, प्रत्यक्षात शेख यांनी इस्लाम पक्षाची स्थापना केली असून या पक्षाच्या माध्यमातून ते मालेगाव मध्य मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.
महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांची संख्या 11.36 टक्के आहे. राज्यातील सुमारे 38 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरतात. मालेगाव मध्य सारख्या काही मतदारसंघांमध्ये हमखास मुस्लिम उमेदवार निवडून येतो. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इस्लाम पक्ष रिंगणात उतरल्याने अल्पसंख्य समाजाची मते आकृष्ट करू पाहणाऱ्या पक्षांसमोर काही प्रमाणात आव्हान उभे राहणार आहे.
दरम्यान, या नव्या पक्षाचे नाव आणि त्याच्या ध्वजावरील इस्लाम शब्दाला मुस्लिम धर्मगुरूंनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या नावावरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.