- राज्य
- निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात
निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात
शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत घेतला निर्णय
नवी दिल्ली: प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ठपका मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर ठेऊन इंडी आघाडी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा आढावा घेण्याबरोबरच निवडणूक यंत्राबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यावर विचार करण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी, काँग्रेस नेते गुरुदास सिंह संपल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार उपस्थित होते.
निवडणूक आयोग केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रभावाखाली असल्याने निवडणूक यंत्रात फेरफार करणे आणि मतदार यादीतील मतदारांची नावे कमी करणे, असे प्रकार होत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा आणि पराभूत उमेदवारांकडे असलेले पुरावे न्यायालयात सादर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.