तळेगाव- एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्ष सुरू
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
बालगुन्हेगारी रोखण्याच्या अनुषंगाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्षाची सुरुवात करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन शनिवारी (दि. १८) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक रणजीत जाधव, होप फॉर द चिल्ड्रन्स संस्थेच्या कार्लीन वॉल्टर, कार्लीन टेक्नॉलॉजीचे सीएफओ अजय चौधरी उपस्थित होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. बालकांविषयीच्या कायद्याबाबत माहिती असलेल्या बालस्नेही पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, बालगुन्हेगारी रोखण्यासाठी बालस्नेही पोलीस कक्षाची मदत होईल. आजची बालके उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालस्नेही कक्षाची मदत होईल. असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.
चौबे पुढे म्हणाले,आजकाल कुणालाही कुठलीही अडचण आली; तर प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस कर्मचारी सर्वात पुढे आलेले आहेत. समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांसह घरातील नवरा-बायकोची भांडणे, मुलांवरील अत्याचार असोत कुठल्याही अडचणीत लोक पोलिसांकडे धाव घेतात आणि पोलीस सगळ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात.
होप फॉर द चिल्ड्रन्स संस्थेच्या माध्यमातून चाइल्ड कौंसिलींग द्वारे बालगुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होत असल्याचे सहायक आयुक्त विशाल हिरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. वॉल्टर यांनी त्यांच्या संस्थेला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काम करण्याची संधी दिल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. पुढील काळात बालस्नेही कक्ष तसेच इतर उपक्रमांमधून आपण भरीव काम करणार असल्याची ग्वाही वॉल्टर यांनी दिली.
Comment List