प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो-खो विश्वचषक
भारताने नेपाळ संघाचा ३८ गुणांच्या फरकाने पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेल्या आणि भारतीय महिला खो खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिने आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर भारतीय संघाला खो-खो विश्वचषक जिंकवून दिला आहे. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने नेपाळ संघाचा ३८ गुणांच्या फरकाने पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले.
प्रियंका इंगळे हिचे व आणि भारतीय महिला खो-खो संघाचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले.
प्रियंका इंगळे हिचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून ती पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथील वडमुखवाडी येथे लहानाची मोठी झाली. तिने प्राथमिक शिक्षण श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी येथे पूर्ण केले, जिथे तिला खो-खो खेळात करिअर करण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रियंकाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेआहे
सातवीत असतानाच तिने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती.प्रियंका हिने पंधरा वर्षांच्या खेळाडू आयुष्यात तब्बल २३ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. २०२३ मध्ये तिने चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर २०२२ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावरील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
मावळ तालुक्याची मान उंचावली
प्रियंकाच्या या विजयामुळे इंद्रायणी महाविद्यालय आणि मावळ तालुक्याची मान उंचावली आहे. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले, "प्रियंका इंगळेने आपल्या कर्तृत्वाने महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नेहमीच क्रीडा प्रकारात पोषक वातावरण निर्माण करते, ज्यामुळे भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडतील."प्रियंका इंगळेच्या यशामुळे संपूर्ण तळेगाव दाभाडे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Comment List