मिशन मोडवर काम करून तालुक्यातील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक ;आमदार सुनील शेळके यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेतला.
यामध्ये प्रामुख्याने डोंगरगाव – कुसगाव योजनेच्या ठेकेदारास पुढील ८ ते १० दिवसात उर्वरित पाईपलाईनचे कामासह टाकीच्या गळतीचे काम पूर्ण करण्याबाबतचे आदेश देण्याबाबत अधिकाऱ्यांना आमदार सुनील शेळके यांनी सूचना केल्या. त्याचप्रमाणे या योजनेस टाटा धरणातून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने या बाबतीत टाटा पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक पाणी पुरवठा सोडण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले .
जरतसेच पाटण व ८ गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व खासगी मालकी क्षेत्रामुळे रखडलेल्या पाईपलाईनचे कामाबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून पुढील ४ दिवसात काम सुरु करण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या. कार्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील वलवण येथील पंप हाऊसचे काम तत्काळ सुरु करून उर्वरित वितरण व्यवस्था व टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत देखील आदेश देण्यात आले मळवली येथील रस्ता क्रॉसिंगमुळे रखडलेली पाईपलाईन पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी मिळणेबाबत संबंधितांना सूचना या वेळी देण्यात आल्या
तसेच तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत असलेल्या खडकाळे पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या ०८ दिवसात सुरु करून कामास गती देण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीच्या थकीत वीजबिलाबाबत एम.एस.ई.बी. विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याबाबत अधिकाऱ्यांना देखील सूचना देण्यात आल्या.
तळेगांव पासून जवळ असलेल्या वराळे पाणी पुरवठा योजनेतील सौरपॅनेलसाठी जागा उपलब्धततेचा प्रस्ताव सादर करण्यात येऊन उर्वरित वितरण व्यवस्थेचे काम तात्काळ पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदारास सूचना यावेळी दिल्या. मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे दालनात सदर बैठक संपन्न झाली,
यावेळी अधिकाऱ्यांसह सर्व कामांचे ठेकेदार व स्थानिक प्रतिनिधी देखील उपस्थित होते. सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्यात येऊन काम पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांसह मी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन कामाचा दर्जा तपासणार असल्याने ठेकेदारांनी प्रामाणिकपणे काम पूर्ण करून घेण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी सूचना केल्या आहेत.
About The Author
![Satish Gade Picture](https://marathi.thedemocrat.in/media/100/2024-07/satish-gade.jpeg)
Comment List