दिल्ली निवडणुकीत सप आणि तृणमूलचा 'आप'ला पाठींबा
इंडी आघाडी विस्कटली, काँग्रेस एकाकी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याची क्षमता केवळ आम आदमी पक्षाकडे असल्याचा दावा करून समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे इंडी आघाडी विस्कटली असून या निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून आठ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दिल्लीत काँग्रेस पक्षाकडे सक्षम पक्ष संघटन नाही. त्यामुळे भाजपला पराभूत करण्याची ताकद काँग्रेसकडे नाही. केवळ आम आदमी पक्ष भाजपला हरवू शकतो. त्यामुळे आपला पाठींबा त्या पक्षाला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात आपण अरविंद केजरीवाल यांच्यासह सहभागी होऊ, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे, तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष म्हणाले की, दिल्लीमध्ये भाजपाला पराभूत करण्याची क्षमता आम आदमी पक्षात आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचे सरकार स्थानापन्न होईल याचा विश्वास आम्हाला आहे. त्यामुळे आमचा पक्ष आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करीत आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष यांच्यासह अन्य घटक पक्ष इंडी आघाडीच्या छत्राखाली लढले होते. या विधानसभा निवडणुकीत मात्र दिल्लीत इंडी आघाडीचे अस्तित्वच उरलेले दिसत नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस एकटी पडली आहे.
Comment List