भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे बैठक
मुंबई: प्रतिनिधी
आज आणि उद्या येथे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील भाजपचे सर्व मंत्री आणि संघाचे राज्य स्तरावरील पदाधिकारी या बैठकीत सहभागी होत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपच अनेक नेत्यांनी संघाबाबत विपरीत विधाने केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संघ स्वयंसेवकांनी कोणताच रस दाखवला नाही. त्याचा फटका भाजपला देशभरात सहन करावा लागला.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असताना मात्र भाजप आणि संघ यांच्यामध्ये समन्वयाने जबाबदारी आणि कामाचे वाटप करण्यात आले. या निवडणुकीत संघाच्या राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकाऱ्यांपासून सर्वसामान्य स्वयंसेवकांपर्यंत सर्वांनी मनापासून प्रचाराचे काम केले. संघाचे स्वयंसेवक घरोघरी पोहोचून पक्ष आणि सरकारच्या कामाची माहिती देत होते. त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी घरोघरी जाऊन मतदारांना घराबाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला भरघोस यश प्राप्त झाले.
विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशामुळे भाजपचे मनोबल उंचावलेले आहे. लवकरच येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेतील विजयाची पुनरावृत्ती करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्या दृष्टीने संघ आणि भाजप यांच्या संयुक्त बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comment List