ठाकरे सेनेच्या पाठोपाठ अजित पवार गटाचा स्वबळाचा नारा
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिले संकेत
अहमदनगर: प्रतिनिधी
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आल्यानंतर आता महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश प्राप्त झाले तर महाविकास आघाडीची अवस्था बिकट बनली आहे. आगामी काळात येऊ घातलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट स्वबळावर लढवणार असल्याचे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी देखील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिवेशन शिर्डी येथे होत आहे. पक्षाची आगामी काळातील वाटचाल, ध्येय धोरणे याबाबत या अधिवेशनात विचार मांडले जात आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवरच पक्ष पुढे जाणार असल्याचे या अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्याबाबतही या अधिवेशनात चर्चा होत आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार देता येणे शक्य आहे त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करेल. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदार आहेत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्यात येईल. निवडणूक निकालानंतर महायुतीचा विचार करता येईल, असे पटेल आणि वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
भुजबळांची उपस्थिती तर मुंडे यांची दांडी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील अशी पक्षातील अनेक ज्येष्ठ मंडळी शिर्डीत दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे पक्षात नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील शिर्डीत उपस्थित आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे हे मात्र अद्याप शिर्डीत आलेले नाहीत.
Comment List