उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?
महायुतीत पालकमंत्री नियुक्तीवरून धुसफूस
मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या आपल्या गावी रवाना झाले आहेत. पालकमंत्री पद देण्यावरून महायुतीत धुसफूस झाली असून आपल्या जवळच्या मंत्र्यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज होऊन शिंदे यांनी गाव गाठल्याची चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे रवाना होण्यापूर्वी पालकमंत्री पदांचा निर्णय मार्गी लावण्यात आला. काल रात्री मंत्रिमंडळातील 34 मंत्र्यांना विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांची पालकमंत्री म्हणून वर्णी लागावी असा शिंदे यांचा आग्रह होता. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने नाराज असलेल्या शिंदे यांनी अचानक गावी जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित यश मिळविले. मात्र, शपथविधी आणि मंत्रिमंडळ ठरविण्यास मोठा विलंब झाला. त्याही वेळी मुख्यमंत्री पद न मिळाल्याने शिंदे नाराज असून त्यामुळेच विलंब होत असल्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी देखील शिंदे हे आपल्या गावी रवाना झाले होते. नाराजीची चर्चा वाढल्यानंतर शिंदे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गावी राहिले असल्याचे स्पष्टीकरण दिले गेले. मात्र, तेव्हापासून शिंदे यांचा दरे दौरा त्यांच्या नाराजीशी जोडला जात आहे.
Comment List