... तर देशात अराजकाची भीती
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विचारवंत उल्हास पवार यांचे मत
पुणे: प्रतिनिधी
राजकारणासह सर्व क्षेत्रात होत असलेली अधोगती, जातीअंताऐवजी टोकदार होत जाणारी जातीयता आणि नीतिमत्तेचा ऱ्हास यामुळे देशात अराजकाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विचारवंत उल्हास पवार यांनी दि डेमोक्रॅटला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली. ही परिस्थिती टाळण्यासाठी राजकीय नेते, समाज धुरीण, साहित्यिक, विचारवंत, आणि शिक्षक वर्गाने पुढाकार घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राची विधानसभा आणि देशाची लोकसभा यांना लाभलेली थोर राजकीय नेत्यांची परंपरा कथन करून सध्याच्या काळात सभागृहात आणि सभागृहाबाहेर होत असलेल्या उथळ स्वरूपाच्या चर्चा आणि विधानांबद्दल उल्हास पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पूर्वीच्या काळात केवळ सत्ताधारी नव्हे तर विरोधकांचा देखील आदर करण्याची, त्यांचे विचार ऐकून घेण्याची परंपरा भारतीय राजकारणात होती. वैचारिक विरोध असला तरी देखील त्यांचे मत ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची राज्यकर्त्यांची भूमिका होती. सध्याच्या काळात विरोधकांना शत्रू मानण्याची वृत्ती दिसून येत आहे, अशी खंत उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची नावे घेऊन राजकारण केले जाते. प्रत्यक्षात त्यांचे विचार आपण किती प्रमाणात अमलात आणतो याचे अवलोकन राजकीय नेते, सामाजिक नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेनेही करणे अवयवाप्रमाणेकेवळ मते मिळवण्यासाठी ज्या राष्ट्रपुरुषांची नावे घेतली जातात त्या सर्वांनी जातीअंतची शिकवण दिली असली तरी देखील प्रत्यक्षात जातीय जाणिवा अधिक तीव्र होत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे समाजातील दरी वाढत चालली आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्या वर्गाने या समस्येचा गांभीर्याने विचार केला नाही आणि समाजाला योग्य मार्गावर आणले नाही तर देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उल्हास पवार यांनी दिला.
... तर पुढील पिढी निर्बुद्ध
सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा परवलीचा शब्द बनला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवन अधिक सुलभ आणि सोपे करण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. प्रत्यक्षात केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे, विशेषतः मानवी अवयवाप्रमाणे अनिवार्य बनलेल्या मोबाईल सारख्या उपकरणामुळे मानवी क्षमतांचा वापर कमी होत असून या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यास अक्षरशः निर्बुद्ध बनू शकेल, अशी भीती उल्हास पवार यांनी जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचा हवाला देऊन व्यक्त केली आहे.
... तरीही आशेचा किरण जिवंत
सध्याची परिस्थिती कितीही नकारात्मक असली तरी देखील या देशाचा आणि अखिल जगाचा इतिहास असा आहे की अनिष्ट गोष्टींची अतिव्याप्तता झाली की त्याच्या विरोधात विधायक विचार बंड करून उठतात. माता, पित्या कडून मिळालेले विचार, वारकरी संप्रदायाकडून मिळालेली शिकवण आणि भारत देशाला लाभलेली उदात्त परंपरा यामुळे आपण कायम सकारात्मक विचार करतो. वाईटाचा अंत होऊन चांगल्याचा उदय होईल, ही आपली श्रद्धा आहे, असे विचार देखील उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
000
Comment List