राज्यात कोरोनाने पुन्हा काढले डोके वर
मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू, पन्नासपेक्षा अधिक जणांना संसर्ग
मुंबई: प्रतिनिधी
दोन वर्षाहून अधिक काळ संपूर्ण जगाला ठप्प करून टाकणाऱ्या कोरोना संसर्गाने राज्यात पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईच्या रुग्णालयात दाखल असलेले दोन रुग्ण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत तर विविध रुग्णालयात ५३ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णसंख्येमुळे महापालिकेचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.
मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल असलेले दोन रुग्ण कोरोना संशर्गामुळे मरण पावले. त्यापैकी एका रुग्णाला नेफ्रोटिक सिंड्रोम तर एकाला कर्करोग होता. मुंबईच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ पर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या नाममात्र होती. मे महिन्यानंतर ही संख्या अधिक वाढू लागल्याचे दिसून आले आहे.
सामान्य सर्दी, नाक वाहणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा ही कोरोना संसर्गाची सामान्य लक्षणे आहेत. संसर्गाची तीव्रता वाढल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागतो. अशी लक्षणे दिसून आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर नसली तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही महापालिकेकडून नमूद करण्यात आले आहे.