भारत राष्ट्र आघाडी लढविणार महाराष्ट्रातील ग्रामपंचायती
पक्ष विस्तारासाठी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित
तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र आघाडी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा तेलंगणाचे अध्यक्ष आणि आघाडीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी केली आहे. ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवा. राज्य आणि केंद्रातील सरकार आपोआप आपल्या पाठीमागे येईल, अशी रणनीती राव यांनी जाहीर केली. आपल्या पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे.
On
नांदेड: प्रतिनिधी
तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र आघाडी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा तेलंगणाचे अध्यक्ष आणि आघाडीचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी केली आहे. ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवा. राज्य आणि केंद्रातील सरकार आपोआप आपल्या पाठीमागे येईल, अशी रणनीती राव यांनी जाहीर केली. आपल्या पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे.
तेलंगणाचा गड मजबूत केल्यानंतर राव यांनी आता राष्ट्रीय राजकारणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांची एकत्र मोट बांधून भाजपा समोर सशक्त आव्हान उभे करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे. स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित करतानाच आपल्या पक्षाचाही तेलंगणाबाहेर विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने शेजारच्या महाराष्ट्रावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
भारत राष्ट्र समितीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करून राव यांनी आत्तापर्यंत नांदेडमध्ये दोन सभा घेतल्या आहेत. शेतकऱ्यांचे हितरक्षण हा प्रमुख कार्यक्रम घेऊन समिती महाराष्ट्राच्या राजकारणात उतरू पाहत आहे. नांदेड जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील सीमा तेलंगणाला लागून आहेत. त्यामुळे नांदेड मधून महाराष्ट्रात पदार्पण करण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
नांदेड हा महाराष्ट्रातील अभावग्रस्त जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अन्य वर्गालाही तेलंगणात मिळणाऱ्या सोयी सुविधांचे आकर्षण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माहूर, किनवट, धर्माबाद, उमरी, देगलूर, बिलोली या तालुक्यातील नागरिकांनी, तेलंगणाच्या धर्तीवर विकास करा अन्यथा आमचे तालुके तेलंगणात समाविष्ट करा, अशी भूमिका घेतली आहे. त्यासाठी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाबरोबरच वकील आणि डॉक्टरांसारखे पांढरपेशे नागरिकही यापूर्वी रस्त्यावर उतरले आहेत. या असंतोषाचा फायदा उठवून महाराष्ट्राच्या राजकारणात भारत राष्ट्र समिती पाय रोवू पहात आहे.
राव यांचे फडणवीस यांना आव्हान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यापूर्वी आपली भेट झाली आहे. त्यावेळी फडणवीस यांनी आपल्याकडे, महाराष्ट्रात कशाला येता, अशी विचारणा केली. तेलंगणात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा तुम्ही महाराष्ट्रात देऊन दाखवा. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही, असे उत्तर दिल्याचे राव यांनी जाहीर सभेत सांगितले. तेलंगणा शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान, शेतीला २४ तास पाणीपुरवठा, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत, हमीभावाप्रमाणे सर्व शेतमालाची खरेदी अशा सुविधा दिल्या जात आहेत. भारत राष्ट्र समितीने एक सभा घेतली तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना एकरी सहा हजार रुपये मदत जाहीर केली, असा दावा करतानाच राव यांनी ही मदत अपुरे असून एकरी दहा हजार रुपये देण्याची मागणीही केली आहे.
About The Author
Latest News
18 Apr 2025 15:01:22
पुणे: प्रतिनिधी
टेस्लाच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कारचे कारखाने भारतात होणार असून पुण्याजवळील चाकण आणि छत्रपती संभाजी नगर येथील औद्योगिक वसाहती मध्ये...