संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल
काँग्रेसला बसणार मोठा धक्का
पुणे: प्रतिनिधी
भोर तालुका आणि परिसरात बडे प्रस्थ असलेले काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे लवकरच काँग्रेसशी काडीमोड घेऊन भारतीय जनता पक्षात डेरेदाखल होणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.
पिता अनंतराव थोपटे यांच्याकडून राजकारण, समाजकारणाचे बाळकडू मिळालेले संग्राम थोपटे यांनी तब्बल तीन वेळा भोर वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अनंतराव थोपटे यांनी तर सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला आहे.
संग्राम थोपटे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. काँग्रेसचे जिल्हा स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. इतकेच नव्हे तर सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुणे शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजीला चाप लावून सामूहिक नेतृत्व घडवण्यासाठी संग्राम थोपटे यांना शहर काँग्रेसमध्ये काही जबाबदारी देण्याचा विचारही केला गेला होता.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर व्हावा यासाठी खुद्द शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांच्याशी दीर्घकाळापासून चालत आलेले राजकीय वैर संपुष्टात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.
काँग्रेसमध्ये एवढी मोठी पार्श्वभूमी लाभलेले संग्राम थोपटे यांनी पक्ष सोडून भाजपच्या वळचणीला जाणे काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. विशेषतः दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण आणि शहरी भागात प्रभाव असलेल्या, युवा आणि ज्येष्ठ अशा दोन पिढ्यांमध्ये समन्वय साधू शकणाऱ्या संग्राम थोपटे यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडून सत्ताधारी पक्षाची कास धरणे काँग्रेसला महागात पडू शकते. त्यांचे हे महत्त्व लक्षात घेऊनच भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थोपटे यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गाठभेट करून दिली असून येत्या रविवारी थोपटे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.