'विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय डुप्लिकेट'
माजी मंत्री अनिल देशमुख यांची महायुती सरकारवर टीका
नागपूर: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेली मतदान यंत्र डुप्लिकेट, मतदार यादी डुप्लिकेट, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा झालेला विजयही डुप्लिकेट आहे, अशी टीका माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केली.
निवडणूक आयोग हे देखील सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाले असून एक बाहुले गेले आणि दुसरे बाहुले आले, अशी निवडणूक आयोगाची परिस्थिती आहे, असेही देशमुख यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले?
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने, विशेषतः भारतीय जनता पक्षाने जनतेला मोठमोठी आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून जमिनीचा सातबारा कोरा केला जाईल, असे आश्वासन दिले होते. सरकार सत्तेवर येऊन चार महिने झाले तरी देखील या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. शेतकऱ्यांसाठी हे सरकार २० हजार कोटी रुपयांचा निधी हे सरकार खर्च करू शकत नाही काय, असा सवालही देशमुख यांनी केला.
लाडक्या बहिणींची सरकारकडून फसवणूक
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दीड हजार ऐवजी 2100 रुपये देण्यात येतील, असे आश्वासनही महायुतीने दिले होते. आज पर्यंत या सरकारने हे आश्वासन देखील पूर्ण केलेले नाही. उलट पात्रता पडताळणीच्या नावाखाली अनेक महिलांना अपात्र ठरवून त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे, असा आरोप देशमुख यांनी केला.
कायदा सुव्यवस्था ढासळलेली
राज्यातील कायदा व्यवस्था संपूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप करून देशमुख यांनी, राज्यकर्तेच जर गुंड, गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर कायदा सुव्यवस्था स्थिती कशी चांगली राहणार, असा सवालह त्यांनी केला.
समाजा समाजात तेढ उत्पन्न करणे अयोग्य
औरंगजेबाची कबर उखडून काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला नाही तर आपण तेथे कारसेवा करू, या विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना देशमुख म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेची ही भूमिका दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे प्रश्न उकरून काढून समाजात तेढ निर्माण करणे अयोग्य आहे. यामुळे समाजात द्वेष पसरवला जात आहे. या प्रकाराची शासनाने दखल घ्यावी.
त्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या
राज्यात दीर्घकाळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या निवडणुकांचा प्रश्न न्यायालयासमोर प्रलंबित आहे. वास्तविक सर्वसामान्य जनता प्रशासक राजला कंटाळली आहे. त्यामुळे सरकारने हा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावे. सरकार आपली बाजू मांडण्यास कमी पडते आहे का, याबद्दल आत्मपरीक्षण करावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर पार पाडाव्या, अशी मागणीही देशमुख यांनी केली.
सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडणार महायुती सरकार
या सर्व बाबींवरून सरकारचा नाकर्तेपणा स्पष्ट होत आहे. हा नाकारतेपणा सर्वसामान्य जनतेसमोर मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारची खरी बाजू जनतेसमोर मांडण्यात येणार आहे, असेही देशमुख म्हणाले.
Comment List