'आम्ही बहिणींचे लाडके, त्यामुळे तुम्ही झाले दोडके'
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना चिमटे
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवरून आम्ही बहिणींचे लाडके झाले आहोत आणि तुम्ही दोडके झाले आहात, अशा शब्दात विरोधकांना चिमटा काढतानाच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेत काही सुधारणा केल्या जातील, मात्र ही योजना बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही अर्थसंकल्पाला उत्तर देताना सभागृहात दिली. ही योजना राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी असल्याचा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये दरमहा जमा होतात. ही योजना महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत प्रभावी योजना आहे. प्रवीण दरेकर यांनी या योजनेतील लाभार्थी महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून २५ हजार रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे.
राज्यातील महिला विकास महामंडळ, जिल्हा सहकारी बँका, इतर सहकारी बँका यांनी काही उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेला जोडून कर्ज देण्याच्या योजना अमलात आणाव्या, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
या योजनेच्या अंमलबजावणीनंतर महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या तर ती योजना केवळ महिलांना मदत करणारी न राहता त्यांना सक्षम करणारी होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना तब्बल 45 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. हा निधी कमी नाही. या निधीतून स्वतःचा उद्योग निर्माण करणाऱ्या महिलांच्या माध्यमातून उत्पन्न होणारा महसूल राज्याच्या अर्थव्यवस्थेत जमा होणार आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असा दावाही त्यांनी केला.
Comment List