देवगडच्या सेंद्रिय हापूस आंबा महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
थेट शेतकरी ते ग्राहक आंबा महोत्सव गणेश कला क्रीडा केंद्र येथे सुरू
पुणे, प्रतिनिधी
शेतकऱ्याकडून थेट पुण्यातील आंबा प्रेमींना नैसर्गिकरित्या पिकवलेला, कोणत्याही रसायनाचा वापर न केलेला विषमुक्त असा जीआय मानांकन प्राप्त देवगड आंबा मिळावा, या उद्देशाने स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे देवगड हापूस आंबा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात २४ आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंबा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवगड यांचे सहकार्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कोकण रत्न देवगड हापूस फार्मर प्रोड्यूसर कंपनी तर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, २० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.
या आंबा महोत्सवात देवगड तालुक्यातील पडेल पंचक्रोशीतील २४ आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी स्टॉल लावलेले आहेत. पुण्यातील लोकांना सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला देवगड हापूस थेट शेतकऱ्यांकडून मिळावा, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सर्व शेतकरी हे जीआय मानांकन प्राप्त असून, अस्सल देवगड हापूस आंब्याचे उत्पादन करतात. देवगड हापूस आंबा हा त्याच्या रंग, रूप, स्वाद आणि त्याचा गंध यासाठी जगप्रसिद्ध आहे. जास्तीत जास्त लोकांनी देवगड हापूस आंब्याच्या या महोत्सवाला भेट देऊन आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने पुणेकरांना करण्यात आले आहे.
000