पाणी टँकरच्या दरांमध्ये दुप्पट वाढ, महापालिकेने केले हात वर
ऐन उन्हाळ्यात घरातील घागर उताणी, नागरिकांच्या डोळ्यात पाणी
पुणे: प्रतिनिधी
रखरखत्या उन्हाळ्याचा दीड महिना बाकी असतानाच पाण्याअभावी घरातील घागर उताणी झाली असून नागरिकांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. केवळ दोन आठवड्याच्या कालावधीत टँकरच्या दरात दुप्पट वाढ झाली असून याबाबत काही करू शकत नसल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने हात वर केले आहेत. नागरिकांची पाण्यासारखी मूलभूत गरज भागवण्यासाठी आणि टँकरच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी राज्य शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध असलेल्या पुणे शहर आणि परिसराला सध्याच्या काळात पाण्याचा तुटवडा ही बाब नवी राहिलेली नाही. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आत्तापासूनच पुणे शहर आणि विशेषतः उपनगरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन खाजगी टँकर व्यावसायिकांनी पाण्याचे दर मागील दोन आठवड्यात दुप्पट केले आहेत. दोन आठवड्यापूर्वी 700 रुपये दराने उपलब्ध असलेले टँकर्स आता चौदाशे रुपये आकारू लागले आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या तिजोरीवर मोठा ताण येऊ लागला आहे.
या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी खाजगी टँकर व्यावसायिकांवर आपले कोणतेही नियंत्रण नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. महापालिकेच्या टँकर चालकांकडून अतिरिक्त रकमेची मागणी केली गेली तर 1800 1030 222 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 8888 251 001 या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
टँकर व्यावसायिकांकडून दरवाढीचे समर्थनच केले जात आहे. आम्हाला खाजगी स्त्रोतांतून पाणी खरेदी करावे लागते. टँकरची देखभाल दुरुस्ती, इंधन, चालक आणि कर्मचाऱ्यांचे पगार असे अनेक खर्च असतात. वाढत्या महागाईमुळे या सर्व खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दरवाढ करण्याखेरीज आमच्याकडे पर्याय नाही, असा टँकर व्यावसायिकांचा दावा आहे.
यासंदर्भात आपण विधिमंडळात प्रश्न उपस्थित करू, असे आमदार योगेश टिळेकर सांगतात. नागरिकांना किफायतशीर दरात, वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे. त्याचप्रमाणे टँकर व्यावसायिकांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या दृष्टीने मार्ग काढणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पुणे शहर आणि परिसरात सन 2018 मध्ये पाण्याच्या टँकर व्यवसायाची उलाढाल सुमारे 100 कोटी रुपये एवढी होती. तज्ञांच्या म्हणण्यानुसार पाण्याची वाढती मागणी आणि वाढते नागरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे ही उलाढाल सध्या दुप्पट झाली असावी.
या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या व्यवसायाचे योग्य नियमन केले जावे. त्यासाठी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करणे आणि मनमानी दरवाढ करणे याला आळा घातला जावा.
टँकर व्यवसायावर दरवाढीबाबत कायदेशीर बंधने घातली जावी.
टँकरच्या पाण्याची नियमित तपासणी करून ते आरोग्यपूर्ण असल्याची खात्री करून घ्यावी.
अवैध पाणी उपसा आणि पुरवठा याला आळा घालण्यासाठी टँकर व्यावसायिकांना परवाने देण्यात यावे आणि त्यांच्या वाहनांचे ट्रॅकींग करण्यात यावे.
टँकर व्यावसायिकांनी अतिरिक्त दर आकारणी केल्यास अथवा पाणीपुरवठा करण्यास विलंब केल्यास त्यांच्याबद्दल रीचसर तक्रार दाखल करता यावी या दृष्टीने कायदा करण्यात यावा, अशा नागरिकांच्या मागण्या आहेत.