प्रविण शिंदे
बाबासाहेबांना समजून घ्यायला आधी आपण जातीपातीच्या भिंती ओलांडून मानवतावादी व्हावं लागेल. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय त्याच निकषावर घेलेले आहेत. त्यातून आधुनिक भारताची निर्मिती झाली आहे, त्यामुळेच आपण भारतीय म्हणून त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. आणि जर उतराई व्हायचे असेल तर किमान त्यांच्या विचारांवर चालायला हवं.
बाबासाहेबांच्या आयुष्याचा हिशोब लावणे तसे खूप अवघड आहे, किंबहुना तो ताळमेळ लावण्याची आपली क्षमता नाही. बाबासाहेबांना उणेपूरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य मिळाले. त्यापैकी त्यांची ३० वर्षे शिक्षणात गेली, यामध्ये आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.
बाबासाहेबांना लेखन आणि चळवळीना अवघी २५ वर्षे मिळाली, त्यात त्यांचा व्याप आणि पळापळीतून ने त्यांचे स्वस्थ अजिबात चांगले राहत नव्हते, इतक्या थोड्या काळात हा माणूस विविध सामाजिक आणि राजकीय समस्यांवर जनजागृती करण्यासाठी अनेक नियतकालिके सुरू करतो. त्यापैकी प्रमुख नियतकालिके म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत.
हा माणूस २३ ग्रंथ लिहितो, भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २३ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते, शेकडो लेख लिहून, भाषणे करत राहतो.
लिखाणाची ही पकड जरासुद्धा न सुटता हा माणूस सामाजिक न्यायासाठी अनेक चळवळी आणि आंदोलने केली, यामध्ये महाड सत्याग्रह, मनुस्मृती दहन, चवदार तळे,काळाराम मंदिर आंदोलन, बहिष्कृत हितकरणी सभा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद, आणि हजारो मैलांचा प्रवास केला.
गेल्या शतकभरात आपल्यातील एकही नेता, बाबासाहेब सोडा त्यांच्या आसपासही आपल्या कार्यातून जाऊ शकलेला नाही. आजच्या सारखी विमान, हेलिकॉप्टर सारखी आधुनिक कोणतीही साधने नव्हती, मिडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही, अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही, तरीही देशभर त्यांनी लाखो लोक जोडले, गावकुसाबाहेर असणाऱ्या प्रत्येक गावात पोहचले बाबासाहेब, त्यांनी पुकारलेल्या प्रत्येक आंदोलनात महात्मा गांधी यांची नीती, महात्मा फुले, बुद्धांचा विचार दिसतो. कारण त्यांनी त्या काळात खेड्यात संदेश पोहचवले, फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेल्या माणूसपण हिरावलेल्याला शिक्षणाची प्रेरणा दिली.
अशी कोणती भाषा असेल ज्यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन गावात मान वर करून न बघणारे, थेट व्यवस्थेविरुद्ध उभी राहिली असतील, म्हणून बाबासाहेब जिंदाबाद आहेत....आणि ते कायम राहतील.
000