सावित्रीबाई फुले विद्यापीठातील बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजिच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षी 'पेड इंटर्नशिपची' संधी
पुणे - सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये २०२४ या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पहिल्याच वर्षी या अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेश मर्यादा पूर्ण झाली होती. या अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑसेलचेन (Accelchain) या कंपनीकडून ब्लॉकचेन प्रोजेक्टवर 'पेड इंटर्नशिपची' संधी मिळाली आहे. पहिल्या फेरीत १२ विद्यार्थ्यांची या प्रकल्पांसाठी निवड केली जाणार असून 'इनोव्हेटिव आयडिया' या संकल्पने अंतर्गत ब्लॉकचेन टेक्नोलॉजी वरील प्रोजेक्ट तयार केले जाणार आहेत.
'इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्स' या संकल्पनेला चालना देऊन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालू करून विद्यार्थांना रोजगारक्षम बनवण्याच्या महत्वकांक्षी हेतूने विद्यापीठाने बी.एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमाची सुरूवात केली होती. ते उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल असल्याची भावना सावित्रीबाई फुले विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केली. या वर्षीच्या बी. एस्सी ब्लॉकचेन टेक्नोलॉजी पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज चालू झाले असून विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरावेत, तसेच अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाला भेट द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या काळात डेटा सिक्युरिटीच्या बाबतीत ब्लॉकचेन टेक्नोलॉजी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. विद्यार्थ्यांचा या तंत्रज्ञानाकडे वाढता कल त्यांच्या करिअरच्या दृष्टीने योग्य पर्याय ठरेल. - प्रा. डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)