कथित काश्मीर एकता दिनी रचला दहशतवादी हल्ल्याचा कट
जैश ए मोहोम्मद, लष्कर ए तय्यबासह हमासच्या म्होरक्यांचा सहभाग
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट या ठिकाणी शहीद साबीर स्टेडियममध्ये दहशतवादी संघटनांनी काश्मीर एकता दिनाच्या नावाखाली आयोजित केलेल्या मेळाव्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट रचला गेला.
त्यामध्ये हाफीज सईद, मसूद अजहर यांच्यासह इराणस्थित हमास या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या डॉ. खालिद कद्दुमी याचाही सहभाग होता, अशी माहिती उघड झाली आहे. या निमित्ताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रथमच हमासचा शिरकाव झाला आहे.
या मेळाव्यात उपस्थित दहशतवादी म्होरक्यांनी भारताच्या विरोधात भडकाऊ भाषणे केली. काश्मीरला भविष्यातील गाझा बनविण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला. काश्मीरचा जिहादचे आगामी मैदान, असा उल्लेख करण्यात आला. जिहादच्या नावाखाली दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी भडकवण्यात आले.
या मेळाव्यात हाफिज सईदचा मुलगा, मसूद अजहरचा भाऊ तल्हा सैफ, जैश ए मोहम्मदचा कमांडर अजगर खान काश्मिरी, मसूद इलियासी हे दहशतवादी टोळक्याचे म्होरके उपस्थित होते. या सर्वांनी भारताच्या विरोधात गरळ ओकली. या मेळाव्यात हमासच्या दहशतवाद्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या निमित्ताने पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि हमास यांची अभद्र युती आकाराला आली आहे.