नवी मुंबईत साजरी झाली एक आगळीवेगळी व अनुकरणीय भीम जयंती!!
१४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती महोत्सव समिती तर्फे सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे एका आगळ्यावेगळ्या, अभूतपूर्व व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीची विशेषता म्हणजे संपूर्णतः प्रदूषणमुक्त रॅली. नो डीजे, नो फटाके किंवा नो धांगडधिंगा. एकदम साधी आणि शांततापूर्ण मिरवणूक होती ती. फारच शिस्तबद्धपणे. दुसरं काही नाही, फक्त बाबासाहेब व भारतीय संविधानातील मानवी मूल्यांचा जयघोष!
वेगवेगळ्या रंगांचे फेटे घातलेले उपासक व उपासिका सामाजिक सहिष्णुता, सलोखा व बंधुभावाचा संदेश देत होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी (पी. ई. एस.) सीबीडी बेलापूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि अत्यंत उत्साहाने या मिरवणुकीत भाग घेतला. मुलींनी लेझिम वाद्यांच्या तालात अत्यंत अप्रतिम, लयबद्ध व मनोहारी लेझीम नृत्य सादर केले. ब्लॅक व ऑरेंज बेल्ट असलेल्या कराटेपटूंनी स्वरक्षणार्थ मार्शल आर्टचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. येणाऱ्या जाणाऱ्या अनोळखी लोकांनी सुद्धा रस्त्याच्या दोन्ही कडेला क्षणभर उभे राहून या अभूतपूर्व अशा मिरवणुकीचा आनंद घेतला तसेच आपल्या मोबाईलने या ऐतिहासिक क्षणाला टिपले.
विद्वान बौद्ध भिक्खु वंदनीय भदंत विमलकित्ती गुणसिरीजी यांच्या परिकल्पनेतून उदयास आलेला हा एक आगळावेगळा प्रयोग होता. उद्धेश हाच की नवी मुंबईतील सर्व बौद्ध जणांनी एकत्र येऊन अत्यंत साधेपणाने महामानवाची जयंती साजरी करावी व समाजाला काहीतरी चांगला संदेश द्यावा. पैशाचा अपव्यय टाळावा. बाबासाहेबांच्या बोधिसत्व मिशनची कास धरावी. सद्धम्मिक बंधु भगिनींनी त्यांच्या या कल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी स्वतःला झोकून दिले हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
मिरवणुकीसाठी दोन रथ सुसज्जित करण्यात आले. एका रथात अत्यंत देखणी अशी बुद्ध गया येथील महाबोधी महाविहाराची प्रतिकृती आणि दुसऱ्यात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीसोबत बाबासाहेब व तथागत बुद्धाची प्रतिमा बसविण्यात आली. दोरखंड बांधून भीम सैनिकांनी दोन्ही रथांना पुढे पुढे ओढत नेले. बाबासाहेबांप्रती आदर व्यक्त करतानाच त्यांच्या उदात्त मिशनला सतत पुढे नेण्याची प्रामाणिक व निष्ठेची भावना त्यात झळकत होती. भारताचा सर्वोच्च व पवित्र ग्रंथ म्हणजे संविधान! संविधानातील आदर्श मानवी मूल्यांनुसार आचरण, त्यांचा प्रचार नि प्रसार, तसेच या पवित्र ग्रंथाचे रक्षण करण्याची उर्मी व निर्धार त्यात दिसत होता.
मिरवणुकीची सांगता एका जाहीर सभेने झाली. नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचे नेते मान. राजाराम पाटील, तसेच अभ्यासू सामाजिक कार्यकर्ते मान. डॉ. वसंत म्हस्के या विद्वान वक्त्यांनी देशातील सध्याची परिस्थिती, तिचे वास्तव आणि प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला मार्ग या विषयावर श्रोत्यांचे प्रबोधन केले. जाहीर सभेचे अध्यक्षपद इंजीनियर जागेश सोमकुवर यांनी भूषविले. प्रास्ताविक प्राचार्य मान. बी. बी. पवार यांनी केले. सभेचे संचलन मान. संतोष कुशलवर्धन तर आभार प्रदर्शन मान. सूर्यकांत बोधी यांनी केले. पाहुण्यांना दोन पुस्तकांचा एक संच भेट देऊन त्यांचे आभार मानण्यात आले. मिरवणूक तसेच सभेचे संपूर्ण विडियो रेकॉर्डिंग करण्यात आले असून लोकप्रिय ‘आवाज इंडिया’ यूट्यूब चॅनेलवर ते लवकरच प्रसारित करण्यात येईल.
ज्याप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना मांडली गेली अगदी त्याचप्रमाणे सर्व तंतोतंत घडले याचे मनस्वी समाधान आयोजनकर्त्यांना वाटणे स्वाभाविकच आहे! ज्यांनी ज्यांनी या अनुपम कार्यासाठी परिश्रम केलेत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहयोग दिला, दान दिले, अशा सर्व धम्म बंधु आणि भगिनींचे हार्दिक आभार, मनःपूर्वक साधुवाद. पी. ई. एस. सीबीडी बेलापूर येथील विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे विशेष आभार.
अखिल नवी मुंबई संयुक्त नागरी जयंती समिति तर्फे आयोजित अनुकरणीय अशा या भीम जयंतीच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यापासून बरेच जणं मुकले असतील याचा खेद वाटतो. परंतु येणारी बुद्ध पोर्णिमा तसेच पुढच्या वर्षी येणारी भीम जयंती हे आपले अत्यंत महत्वाचे दोन्ही महोत्सव नवीन उमेदीने व नव्या ताकदीने एकत्रित येऊन (संयुक्तपणे) साजरे करण्याचा विचार करू या. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्याच्या या प्रयत्नात सहभागी होऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करू या.
जय भीम!
(शब्दांकन: जागेश सोमकुवर, ओएनजीसी, मुंबई)