'... म्हणून हल्ल्याच्या ठिकाणी तैनात नव्हते सुरक्षा रक्षक'
सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे सरकारने केले कबूल
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याचे केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मान्य केले. प्रवासी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि स्थानिक हॉटेल चालक यांनी पर्यटक बैसरन येथे जात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली नाही. त्यामुळे पहलगाम येथे भारतीय सैन्याचे सैनिक तैनात असून देखील त्यांना बैसरन येथे पाठवण्यात आले नाही, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 20 जण जखमी झाले. या हल्ल्याची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या हल्ल्याबाबत सरकार जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले.
काश्मीरमध्ये दहशतवादाला आळा बसून स्थितिसामान्य होत होती. राज्यातील अर्थव्यवस्थेने वेग घेतला. पर्यटन वाढत गेले. त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना झाला. ही स्थिती बिघडविण्याच्या दृष्टीने हा हल्ला करण्यात आल्याची सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सांगण्यात आले.
दहशतवादी कारवाया सहन न करण्याचे भारताचे ठाम धोरण आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोर आणि या हल्ल्याचे सूत्रधार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी या बैठकीत स्पष्ट केले. या प्रकरणात केंद्र सरकार जी काही कारवाई करेल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी सांगितले.