वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल
तपास करून कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश
पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल घेतली असून पोलिसांना तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
वैष्णवी हगवणे यांनी त्यांच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी राजेंद्र हगवणे, वैष्णवीचे पती शशांक, सासू, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू व नणंदेला अटक करण्यात आली असून सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर हे दोघेजण फरारी आहेत.
या प्रकरणावरून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. विवाहाच्या वेळी हुंडा म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्यूनर गाडीची चावी अजित पवार यांच्या हस्ते शशांक हगवणे याला देण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपाची दखल घेणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भाग पडले आहे. त्यांनी हगवणे कुटुंबाचा आपल्या पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. हगवणे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी नव्हती, असा दावा तटकरे यांनी केला आहे.