राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या
हुंड्यासाठी छळ केल्याचा आई-वडिलांचा आरोप
पुणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी (वय 33) तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या मुलीचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
राजेंद्र हगवणे, त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा आणि वैष्णवीचा पती शशांक, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी शशांक, त्याची आई आणि बहीण यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा यांचा शोध पोलीस घेत आहेत.
आपली मुलगी वैष्णवी हिचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी सतत छळ केला जात होता. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आहेत, असे वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या हगवणे यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबावर सुनेला छळल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.