डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची समता सर्वस्पर्शी व सर्वव्यापी : ॲड.क्षितीज गायकवाड
पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्षशील जीवन आणि समाज चिंतन अभ्यासायचे असेल तर त्यांनी लिहिलेले साहित्यच मूळातूनच वाचले पाहिजे. आपला समाज अराष्ट्रीय होणार नाही, याची पूर्ण काळजी डॉ.बाबासाहेबांनी घेतली होती. म्हणूनच आंबेडकरवाद मानणारा हा समाज जोडणाराच असला पाहिजे. त्यांनी माथी भडकवणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. आजच्या आंदोलनजिवींनी चवदार तळे सत्याग्रहाचा आदर्श घेऊन विधायकता जपावी, असे आवाहन करत डॉ बाबासाहेब आंबेडकरांची समता सर्वस्पर्शी व सर्वव्यापी होते, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक ॲड. क्षितिज गायकवाड यांनी केले.
चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या क्रांतीदिनानिमित्त सामाजिक समतेचा लढा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, विवेक विचार मंच, डॉ.आनंद यादव अभ्यास मंडळ व साने गुरुजी तरुण मंडळ आदी संस्थांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.पराग काळकर, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष श्री.प्रदीपदादा रावत, ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत यादव, ओम स्वामी मल्हार चे डॉ. गौरव घोडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.धोंडीराम पवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ.सुनील भंडगे उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार व विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत म्हणाले, "डॉ.बाबासाहेब प्रोटेस्टंट हिंदू स्वतःला म्हणायचे. समाजाचं मन बदलल्याशिवाय समाज बदलणार नाही. डॉ . आंबेडकरांनी मूलभूत पातळीवर विचार करत माणुसकीला जागं करत समाजाचं आत्मभान जागृत केलं. ज्यांची गावकी एक आहे त्यांची भावकी एक झाली पाहिजे. चवदार तळे सत्याग्रहातून समाजाला खडबडून जागं करण्याचं महत्वपूर्ण कार्य त्यांनी केले."
यावेळी मंदिर पुनर्निर्माण, जीर्ण मूर्तींना वज्रलेप आणि ऐतिहासिक समाधी स्थळांचे सुशोभीकरण इ.कामांची दखल घेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 'इंटरनॅशनल आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केलेले डॉ.गौरव पोपट घोडे यांचा त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल प्रकुलगुरु डॉ.पराग काळकर यांच्या हस्ते विद्यापीठाचे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.काळकर म्हणाले, "आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तुंग कार्याचे स्मरण करताना, विद्यापीठातील अध्यासने ही लोकासने व्हावीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची दखल घेत त्यांचा आदर्श समाजासमोर यावा, हाही हेतू या सत्कारामागे आहे. डॉ.घोडेंच्या कार्याची दखल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने हे भूषणावह आहे," असे गौरवोद्गार डॉ.काळकर यांनी काढले.
यावेळी ॲड.प्रशांत यादव व डॉ.गौरव घोडे यांचीशी भाषणे झाली.यावेळी यावेळी संविधानाच्या सरनाम्याचे जाहीर वाचन करण्यात आली. याप्रसंगी संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ.श्यामा घोणसे, लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य डॉ दिलीप शेठ, शाहीरा वीणा अवघडे, प्रा.विजय दरेकर, डॉ.कुंडलिक पारधी, ॲड.प्रसाद सुर्वे, सचिन साठ्ये, आकाश भांगरे, अनिल पारशे इ. विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भंडगे, आभार प्रदर्शन डॉ.सुधाकर हिरे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.बाबासाहेब गव्हाणे यांनी केले.
000