Blockchain | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बी. एस्सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात!
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२५ - २०२६ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून २०२४-२०२५ च्या शैक्षणिक वर्षामध्ये या अभ्यासक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता यावर्षीही प्रवेश क्षमता वेळे आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावेत असे आवाहन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत ३० एप्रिल, २०२५ पर्यंत असल्याचे विद्यापीठामार्फत कळविण्यात आले आहे.
ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये पदवी अभ्यासक्रम सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले राज्य विद्यापीठ आहे. देशात आणि जगभरात नवनवीन तंत्रज्ञानाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या अभ्यासक्रमाला पहिल्याच वर्षी उस्फूर्त प्रतिसाद दिला होता. सध्या विविध क्षेत्रामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. सरकारी, खाजगी सर्वच क्षेत्रात पारदर्शकता, डेटा सुरक्षेसाठी या तंत्रज्ञानाला सक्षम पर्याय म्हणून पाहिले जात आहे. जगभरात डेटा सिक्युरिटीसाठी वाढत असलेली ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या पदवी अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला होता. या अभ्यासक्रमाला मिळालेला प्रतिसाद खूपच सकारात्मक आहे.
ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे एक महत्वाचे चिन्ह आहे. हे सध्याच्या आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अनेक समस्यांवर उत्तर प्रदान करण्यास सक्षम आहे. सुरक्षितता, पारदर्शकता, आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची गरज अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळेच, हा तंत्रज्ञान काळाची गरज बनला आहे आणि याच्या संभाव्य फायद्यांमुळे त्याची स्वीकारार्हता सतत वाढत आहे. प्रा. डॉ. सुरेश गोसावी, (मा. कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
पारंपारिक पदवी अभ्यासक्रमापेक्षा तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन अभ्यासक्रमांना विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढत आहे ही समाधानकारक बाब आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ अशा अभ्यासक्रमांना चालना देऊन भविष्यातील रोजगारभिमुख कौशल्य विद्यार्थ्यांना देण्यासाठी कटिबध्द आहे.
प्रा. डॉ. पराग काळकर (मा. प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सध्या डिजिटल युगातील एक क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे, जे विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जात आहे. विशेषतः वित्तीय सेवा, पुरवठा साखळी व्यवस्थापन, आरोग्यसेवा, सायबर सुरक्षा आणि सरकारी नोंदी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. वस्तूंच्या मागोवा ठेवण्यासाठी आणि बनावट उत्पादनांपासून संरक्षण करण्यासाठी ब्लॉकचेनचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रात याची गरज वाढत आहे. प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर (मा. विभागप्रमुख, तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
000