'सरकारकडून दंगलखोरांवर एकतर्फी कारवाई'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
दंगलखोरांच्या मालमत्तांवर बुलडोझर चाललाच पाहिजे. मात्र, नागपूर दंगल प्रकरणी सरकार दंगलखोरांवर एकतर्फी कारवाई करत आहे. दंगलीची सुरुवात तुमच्या पक्षाच्या तुमच्या विचारांच्या लोकांनी केली आहे. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल राऊत यांनी सरकारला केला आहे.
नागपूर दंगलीचा सूत्रधार समजल्या जाणाऱ्या फहीम खान यांच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझर कारवाई केली आहे. याबाबत बोलताना राऊत यांनी सरकारवर एकतर्फी कारवाईचा आरोप केला आहे.
दंगल दोन्ही बाजूंनी घडविण्यात आली. त्याची सुरुवात तुमचे समर्थन करणाऱ्या, तुमच्या विचाराच्या लोकांनी केली. या सगळ्या प्रकरणाला चिथावणी देणारे लोक मंत्रिमंडळात बसले आहेत. निष्पक्ष कारवाई करायची असेल तर कोकणात बुलडोझर पाठवा. पुण्यात पाठवा, असे राऊत म्हणाले. दोन्ही पक्षांच्या, धर्मांच्या दंगलखोरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राऊत यांनी केली.