'वाघ्याच्या स्मारकाबाबत समोरासमोर चर्चा करू'
छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका
मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पार्थिवाला अग्नी दिला त्यावेळी वाघ्या कुत्र्याने त्यात उडी घेतल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्याचे स्मारक हटविण्यास विरोध करणाऱ्यांनी आपल्यासमोर यावे. आपण त्यांना ऐतिहासिक संदर्भ, पुरावे सादर करू. चर्चा करू, असे छत्रपती संभाजी राजे यांनी नमूद केले आहे.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ असलेले वाघ्याचे स्मारक हटवावे, अशी मागणी करणारे पत्र छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. आज त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या महासंचालकांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ऐतिहासिक संदर्भ आणि शिवभक्तांनी माहिती अधिकारातून मिळवलेली माहिती सादर केली.
वाघ्या कुत्र्याचे स्मारक सन 1936 ला उभे राहिले. ते जर 2036 पर्यंत काढले नाही तर त्याचा समावेश संरक्षित स्मारकात होईल. त्यामुळे ते आत्ताच काढले जावे अशी आपली मागणी आहे, असे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले. वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाचे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नसले तरी देखील आपण त्याचे अस्तित्व नाकारत नाही. त्याच्या स्मारकाला आपला विरोध नाही. मात्र, वाघ्याच्या स्मारकाची उंची खुद्द शिवछत्रपतींच्या स्मारकापेक्षा अधिक असावी, हे कोणत्याही शिवभक्ताला मान्य होणार नाही. वाघ्याच्या स्मारकाचे स्थलांतर होऊ शकते. रायगडाच्या पायथ्याशी वाघ्याच्या स्मारकाचा चांगला प्रकल्प उभारला जाऊ शकतो, असा प्रस्तावही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.