Bhima Koregaon | भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकाच्या विकास कामाला लवकरच सुरुवात करणार: अण्णा बनसोडे
कोरेगाव भीमा : ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ हे शौर्याचे प्रतीक असून ०१ जानेवारी रोजी विजयस्तंभ स्मारकास अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक अनुयायी येत असतात . महाराष्ट्र शासनाच्या वतीने भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकाच्या विकास कामास लवकरच सुरू करण्यात येणार असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापेक्षाही जास्तीचा निधी शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी विजयस्तंभ येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार अण्णा बनसोडे यांनी दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या तुळापूर , वढु बुद्रुक येथील तसेच शूरयोद्धा गोविंद गोपाळ गायकवाड समाधीस्थळी भेट देऊन विनम्र अभिवादन केले .
विजयस्तंभ येथे बार्टी संस्थेच्या वतीने त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, विजयस्तंभाची प्रतिकृती व भारताचे संविधान हे अॕड. गौरक्ष लोखंडे, सुमेध थोरात, रामदास लोखंडे यांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
रामदास लोखंडे यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ जागेबाबत उच्च न्यायालयात सुरु असलेल्या न्यायप्रविष्ठ प्रकरणाची माहिती देऊन बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. सुनील वारे यांनी भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारकाचा विकास आराखडा शासनास सादर केला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अनुसुचित जाती व जमाती आयोगाचे सदस्य अॕड. गौरक्ष लोखंडे, बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, राहुल कवडे, पेरणेच्या सरपंच उषा दशरथ वाळके, कोरेगाव भीमाचे सरपंच संदिप ढेंरगे, विस्तार अधिकारी मोरे, मंडल अधिकारी संदिप झिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल आवचर, साईनाथ वाळके, राजाभाऊ गवदे, भारतीय बौद्ध महासभेचे कोमल वासनिक, सुधाकर लोखंडे, ग्रामविकास अधिकारी रतण दवणे, किसन बिबे, शांताराम पाडळे, सदानंद फडतरे यांच्यासह भीमा कोरेगाव परिसरातील नागरिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000