मंगेशकर रुग्णालयाचा 'बैल गेला अन् झोपा केला'
यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय
पुणे: प्रतिनिधी
यापुढे प्रसूतीसाठी किंवा तातडीच्या उपचारांसाठी आलेल्या कोणत्याही रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. मात्र, जुळ्या मुलींना जन्म देऊ एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेतल्यामुळे हा प्रकार 'बैल गेला आणि झोपा केला' असाच झाला आहे.
मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरीमुळे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला असून रुग्णालयाने भिसे यांच्याकडे दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती, असा आरोप आमदार गोरख हे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.
सरकारने चौकशीचे पाऊल उचलल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय विश्वस्त मंडळांनी तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीत महिला मृत्यू प्रकरणाची चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने जाहीर केला आहे.
मराठी नाट्य आणि संगीत क्षेत्राला मोलाचे योगदान देणारे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे शल्य आपल्या मनात आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी त्यांच्या नावाने धर्मादाय रुग्णालय सुरू करत असल्याचे मंगेशकर कुटुंबीयांनी या रुग्णालयाच्या उभारणीच्या वेळी सांगितले होते. रुग्णालय उभारणीचा निधी जमवण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी गाण्याचे कार्यक्रम केले. त्याला भरघोस प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातील जनतेने रुग्णालय उभारणीसाठी भरीव योगदान दिले. अनेक दानशूर व्यक्तींनी रुग्णालयासाठी सहकार्य केले. सरकारने नाममात्र मोबदल्यात जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अनेक सवलती दिल्या. मात्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची गणना पुण्यातील पंचतारांकित रुग्णालयांमध्ये केली जात आहे. गरीब रुग्णांना या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याची तक्रार अनेक जण करीत आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूने या सर्व प्रकाराला तोंड फुटले आहे.