'स्त्रियांसाठी पहिली शाळा महात्मा फुले यांनी नव्हे तर...'
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे धक्कादायक विधान
पुणे: प्रतिनिधी
स्त्रियांसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी नव्हे तर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी त्यांच्या राजवाड्यात सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढे त्यांचे अनुकरण केले, असे धक्कादायक विधान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महात्मा फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमातच केले.
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी आपल्या राजवाड्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. याच राजवाड्यात घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले, असा दावा उदयनराजे यांनी केला.
छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावे
छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक राजधानी दिल्ली येथे उभारण्यात यावे, अशी मागणी देखील उदयनराजे यांनी यावेळी बोलताना केली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेले छत्रपती शिवरायांचे स्मारक पर्यावरणाच्या कारणामुळे समुद्रात होऊ शकत नसेल तर समुद्रकाठी वसलेल्या गव्हर्नर हाऊसमध्ये या स्मारकाला जागा मिळावी. गव्हर्नर हाऊस तब्बल 48 एकर जागेवर वसलेले आहे. राज्यपालांना रहायला अशी कितीशी जागा लागते, असेही ते म्हणाले.
काढून फेकून द्या तो वाघ्याचा पुतळा
मागील काही काळापासून वादग्रस्त ठरलेल्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबद्दलही त्यांनी भाष्य केले. तो कुत्र्याचा पुतळा काढून फेकून द्या, असे ते म्हणाले. त्या कुत्र्याकडे पहा. इतके लांब कान असलेला कुत्रा भारतीय असू शकतो का? तो कुत्राही ब्रिटिशांचा असेल. त्याचे एवढे कौतुक कशाला करायचे? द्यायचा एक दणका आणि काढून टाकायचे, असे उदयनराजे म्हणाले.