सलमानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
अज्ञातावर गुन्हा नोंदवून पोलिसांकडून तपास सुरू
मुंबई: प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमानच्या घरात घुसून त्याला ठार मारू. त्याची कार बॉम्बने उडवून देऊ, अशा आशयाची धमकी वरळी परिवहन विभागाच्या व्हाट्सअप क्रमांकावर देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सन 2024 मध्ये आजच्याच दिवशी 14 एप्रिलला दोघा दुचाकीस्वारांनी गॅलेक्सी इमारतीतील सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली होती. त्यानंतर सलमानच्या घराची गच्ची बुलेटप्रूफ करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याची गाडी देखील बुलेटप्रूफ करण्यात आली. सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
काळवीट शिकार प्रकरणी न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली असली तरी देखील बिश्नोई टोळीचा या प्रकरणावरून त्याच्यावर राग आहे, असा त्यांचा दावा आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल अशा धमक्या टोळीकडून त्याला अनेकदा दिल्या गेल्या आहेत. सन 2022- 23 आणि 24 मध्ये देखील सलमानला अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. बिश्नोई टोळीतील शार्प शूटर्सकडून सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर पाळत ठेवण्यात आल्याचे प्रकरणही घडले होते.
माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची त्यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयासमोर 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी हे सलमानचे जिवलग मित्र होते. या मैत्रीमुळेच बाबा सिद्दिकी यांची बिश्नोई टोळीकडून हत्या करण्यात आल्याचा दावाही केला जातो.
या पार्श्वभूमीवर सलमानला मिळालेल्या धमकीला मुंबई पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून त्याबाबत कसून तपास करण्यात येत आहे.