'छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान'

शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर अमित शहा यांचे प्रतिपादन

'छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान'

पुणे: प्रतिनिधी

आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरुन संकल्प करत आहोत की आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील तेव्हा आपला देश जगात क्रमांक एकवर असेल. छत्रपती शिवाजी महाराजानंतर औरंगजेब  होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि त्याची कबर इथेच खोदली. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज देशाला आणि जगाला प्रेरणा देणारे आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राजधानी रायगडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते.

 राजमाता जिजाऊ यांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. स्वराज्य, स्वधर्म यासाठी आयुष्य वेचलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलाई, आदिलशाही, निजामशाहीने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम केले.  त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले, असे शहा यांनी नमूद केले.

हे पण वाचा  चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंध:कारात बुडाला होता. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणे हा लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली आणि ती पूर्ण केली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहेत. मात्र, असे साहस मी एकामध्येही पाहिले नाही, असेही शहा म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांकडे धन नव्हते. भूतकाळ त्यांच्यासह नव्हता.  भविष्याबाबत काही माहिती नव्हते. मात्र, स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखवली. पाहता पाहता १०० वर्षांपासून सुरु असलेली मोगलाई संपुष्टात आणून दाखवली. अटकेपर्यंत शिवाजी महाराजांचे मावळे पोहचले. तामिळनाडू, बंगालपर्यंत पोहचले तेव्हा लोकांनी सुस्कारा सोडला की आता आपला देश, आपली संस्कृती वाचली. आज आपण संकल्प सोडू की स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश सगळ्याच आघाड्यांवर क्रमांक १ वर उभा असेल, असे आवाहनही अमित शहा यांनी यावेळी केले. 

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

Advt