महाशक्तीच्या महाप्रमुखांच्या कोलांटउड्या!

महाशक्तीच्या महाप्रमुखांच्या कोलांटउड्या!

स्थित्यंतर / राही भिडे

अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीचा आणि हुकूमशाही कारभाराचा जगाला प्रत्यय येतो आहे. ‘अमेरिकेचे भले मीच करू शकतो,’ असा अहंगंड बाळगून निर्णय घेणाऱ्या ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतच मोठे आंदोलन उभे राहिले. कॅनडा, मेक्सिकोसारख्या देशांनी ट्रम्प यांना माघार घ्यायला लावली. दोन महिन्यांत ट्रम्प यांना अनेकदा आपल्या निर्णयापासून घूमजाव करावे लागले. ट्रम्प यांनी स्वतः होऊनच ही वेळ ओढवून घेतली.

अमेरिकेचा जगातील देशांशी व्यापार असंतुलित असून, त्यामुळे अमेरिकेला मोठा तोटा होत आहे, हे चार वर्षानंतर पुन्हा अध्यक्ष झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना आताच कसे समजले, हा संशोधनाचा मुद्दा आहे. जशास तसे कर धोरण जाहीर करणाऱ्या ट्रम्प यांना दोन महिन्यांत दोनदा माघार घ्यावी लागली. २ एप्रिल रोजी, सुमारे शंभर देशांवर शुल्क लादल्यानंतर केवळ सात दिवसांनी त्यांनी या निर्णयाला ९० दिवसांची स्थगिती दिली. मागच्या महिन्यांतही कॅनडा आणि मेक्सिकोवर कर लादून नंतर एक महिन्याची स्थगिती दिली होती, परंतु ट्रम्प यांनी १२५ टक्के शुल्क लादून चीनला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी सात दिवसांत शुल्क का मागे घेतले, अमेरिकेच्या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल आणि ९० दिवसांनंतर पुन्हा शुल्क कसे लागू केले जाईल, याचे औत्सुक्य आहे. ट्रम्प यांनी ७५ पेक्षा जास्त देशांवर लादलेल्या परस्पर शुल्क आकारणीला त्यांनी ९० दिवसांची स्थगिती दिली. या देशांवर दहा टक्के बेसलाइन टॅरिफ लादण्यात आले. या ७५ देशांमध्ये भारत, बांगला देश, पाकिस्तान, तैवान, व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे; मात्र ट्रम्प यांनी चीनला या निर्णयातून वगळले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे, की ७५ देशांनी व्यापार आणि चलन हाताळणीसारख्या मुद्द्यांवर यूएस वाणिज्य विभाग, ट्रेझरी आणि ‘यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. अनेक देशांनी टॅरिफवर सहकार्य केले. या देशांनी प्रत्युत्तर दिले नाही. मी या देशांना ९० दिवसांचा दिलासा दिला आहे. या कालावधीत, त्यांच्यावर फक्त दहा टक्के शुल्क आकारले जाईल. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही वेळातच अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाचे सचिव स्कॉट बेसंट म्हणाले, की ही बंदी सुरुवातीपासूनच आमच्या रणनीतीचा भाग होती. ‘तुम्ही बदला घेऊ नका, तुम्हाला बक्षीस मिळेल,’ असा संदेश आम्ही इतर देशांना देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे दर जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांना किती देश त्यांच्या निर्णयाचे समर्थन करतात आणि किती विरोध करतात हे पाहायचे होते. कोणते देश चीनबरोबर जातात आणि कोणते देश आपल्याबरोबर येतात, याचा अंदाज ट्रम्प यांना घ्यायचा आहे. जगाची दोन गटांत विभागणी करण्याचा हा डाव आहे.

ट्रम्प यांच्या ‘जशास तसे कर’ धोरणाचा फटका त्यांच्या निकटवर्तीयांनाही बसत होता. ‘टेस्ला’ प्रमुख एलन मस्क यांना लाखो कोटी रुपयांचा फटका बसला. अनेक दिवसांपासून अमेरिकन उद्योगपती, ‘सीईओ’ आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते ट्रम्प यांना शुल्क थांबवण्यास सांगत होते. त्यांना भीती होती, की ट्रम्प जगातील सर्व देशांवर शुल्क लादून अमेरिकेत मंदी आणू शकतात. त्याचे जागतिक मंदीमध्ये रूपांतर होऊ शकते. ट्रम्प यांनी अमेरिकन हेज फंड मॅनेजर आणि ट्रम्प समर्थक बिल ॲकमन यांच्या सल्ल्याने ९० दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी शुल्क लागू केल्याने जगात आर्थिक आण्विक युद्ध सुरू होऊ शकते, असे ॲकमन यांनी अलीकडेच म्हटले होते. हे टाळण्यासाठी दरवाढ थांबवावी, असा दबाव त्यांच्यावर होताच. ॲकमन यांनी पोस्टमध्ये लिहिले, की हे धोरण यशस्वी होताना दिसत नाही. टॅरिफचा परिणाम ताबडतोब थांबवला नाही, तर छोटे उद्योग दिवाळखोर होतील, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकन वित्तीय फर्म ‘जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी’चे ‘सीईओ’ जेमी डिमॉन यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की टॅरिफवरील आर्थिक गोंधळामुळे मंदी जवळजवळ निश्चित आहे. जेमी यांच्या या वक्तव्याचा ट्रम्प यांच्या निर्णयाशी संबंध जोडला जात आहे. तथापि, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या, की माघार घेण्याचे पाऊल ट्रम्प यांच्या मोठ्या रणनीतीचा भाग होता. अशा रणनीतीने अमेरिका आणि जगाचे बाजार कोसळून लाखो गुंतवणूकदार देशोधडीला लागले, त्याचे काय आणि त्याची जबाबदारी कुणाची, असे प्रश्न निर्माण होतात. शुल्क ९० दिवसांसाठी थांबवणे हा ट्रम्प यांचा प्रारंभिक निर्णय आहे. यामागे कोणताही तर्क दिसत नाही. ते त्यांच्या अब्जाधीश मित्रांशी चर्चा करतात, अर्थशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांशी नाही. ट्रम्प यांनी सुमारे शंभर देशांवर शुल्क जाहीर केल्यानंतर त्याविरोधात जगभर आंदोलने सुरू झाली. अमेरिकेतील पन्नास राज्यातील बाराशेहून अधिक शहरांत निदर्शने झाली. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अमेरिका, भारत, जपानसह जगातील शेअर बाजार १० ट्रिलियन डॉलरने घसरले होते. यूएस ट्रेझरी बाँडच्या किमती घसरल्या आणि व्याजदर वाढले. आठ एप्रिल रोजी, यूएस स्टॉक मार्केटचा नॅस्डॅक आणखी पाच टक्के घसरला. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्था हादरल्या. अचानक अमेरिकन रोख्यांची विक्री सुरू झाली. कच्च्या तेलाच्या दरातही मोठी घसरण झाली. अमेरिकन लोकांना भीती होती, की टॅरिफ वाढल्याने देशातील वस्तू अधिक महाग होतील. ‘जेपी मॉर्गन’चे ‘सीईओ’ जेमी डिमन यांनी याला “आर्थिक संकट” म्हटले आहे. वॉलमार्ट आणि टेस्ला सारख्या मोठ्या कंपन्यांनी सांगितले, की शुल्कामुळे त्यांच्या किंमती वाढतील, वस्तू महाग होतील आणि त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल. ‘वॉलमार्ट’ चे ‘सीईओ’ डग मॅकमिलन म्हणाले, की उत्पादनांच्या किमती १५ ते २० टक्के पर्यंत वाढू शकतात. वॉल स्ट्रीट बँकांनी असा इशारा दिला होता, की शुल्कामुळे अमेरिकेत महागाई, वाढती बेरोजगारी आणि मंदी येईल.

ट्रम्प यांनी चीनवर १२५ टक्के शुल्क लादले. चीननेही अमेरिकेवर ८४ टक्के शुल्क लादले. युरोपीयन संघानेदेखील अमेरिकेवर नवीन शुल्क मंजूर केले. व्हिएतनामने अमेरिकेकडून ४५ दिवसांचा आणि बांगला देशने तीन महिन्यांचा वेळ मागितला. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी अमेरिकन नोकऱ्यांसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या अनेक जवळच्या सल्लागारांनी टॅरिफ युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेतेही शुल्काच्या विरोधात होते. ट्रम्प यांच्या शुल्कवाढीमुळे मंदीची संभाव्यता ४० वरून ६० टक्क्यांपर्यंत वाढली होती. जीडीपी आठ टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेतील नोकरदार लोकांच्या पगारात सात टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्याच वेळी, मध्यमवर्गीय कुटुंबाला ५८ हजार डॉलर्स म्हणजेच ५० लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. ‘मिशिगन युनिव्हर्सिटी’चा ग्राहक निर्देशांक ३ वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. याद्वारे खर्च आणि गुंतवणुकीचा अंदाज लावला जातो. आता ट्रम्प यांनी शुल्क मागे घेतल्याचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दिसून आला. ९ एप्रिल रोजी यूएस मार्केट १२ टक्क्यांवर बंद झाले. अमेरिकेच्या ‘नॅसडॉक’ने २००१ नंतरचा सर्वात मोठा नफा नोंदवला, तर ‘डाऊ जोन्स’ ने मार्च २०२० नंतरचा सर्वात मोठा फायदा नोंदवला. अमेरिकन भांडवली बाजारात जवळपास ३० अब्ज शेअर्सची खरेदी-विक्री झाली. त्यामुळे ‘वॉल स्ट्रीट’च्या इतिहासातील सर्वात जास्त व्यापाराचा दिवस ठरला. याशिवाय आशियाई बाजारांमध्येही नऊ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे का होईना अमेरिका सावरायला लागली.

000

हे पण वाचा  बाबासाहेब जिंदाबाद...!

About The Author

Rahi Bhide Picture

जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक

Advertisement

Latest News

विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा विश्व हिंदू परिषद मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने वडगावात तहसिल कार्यालय मोर्चा
वडगाव मावळ/ प्रतिनिधी  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश...
फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंग्रजीला पालखी आणि हिंदीला विरोध हा कुठला विचार?
चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल

Advt