'... त्यापेक्षा पारदर्शकपणे पंतप्रधान निधीचे विवरण प्रसिद्ध करा'
काँग्रेसचे सत्ताधारी भाजपला जाहीर आव्हान
पुणे: प्रतिनिधी
सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून व दबाव आणून मोदी सरकार विरोधी पक्षास बदनाम करण्यात व नेस्तनाबूत करण्यात धन्यता मानत आहे.
ते करण्याऐवजी मोदी सरकारने ‘पंतप्रधान-निधी’ची पारदर्शकता न दडवता त्याचे विवरण जाहीर करावे व राजधर्म निभवावा, अशा शब्दात काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे.
नॅशनल हेरॅाल्ड कथित घोटाळा व गांधी कुटुंबीयावरील सक्तवसुली संचालनालयाच्या आरोपपत्राविरोधात पुणे शहरासह देशभरात आज आंदोलन करण्यात आले. पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या काँग्रेसच्या निदर्शन आंदोलनात ते बोलत होते.
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची बॅंक-खाती गोठवून देखील जनतेने काँग्रेस पक्षाला दुप्पट जागा देऊन मजबूत विरोधी पक्ष म्हणून उभे केले. देशात काँग्रेस पक्ष विरोघी पक्षाची भूमिका सक्षमतेने बजावत असतांना मोदी सरकार स्वातंत्र्य संग्रामात दीपस्तंभाची भूमिका निभावणाऱ्या ‘नॅशनल हेरॅाल्ड वृत्तसंस्थेची व ती स्थापन केलेल्या नेहरू - गांधी कुटुंबाची तथ्यहीन बदनामी करण्याचे कुटील राजकारण’ करत आहे व पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामा विषयी, स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांविषयी असूयाच असल्याचे दाखवून देत आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. मोदी सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेवर व हेतूवर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
या प्रसंगी अरविंद शिंदे, अविनाश बागवे, संजय बालगुडे, अभय छाजेड, रमेश बागवे यांचीही भाषणे झाली. अजीत दरेकर यांनी सूत्रसंचालन केले व प्राची दुधाणे यांनी आभार व्यक्त केले.