जेनसोल घोटाळ्याचे पुणे कनेक्शन उघड
बोगस कारखाना, बोगस ऑर्डर्स, कामगार आणि भागधारक गोत्यात
पुणे: प्रतिनिधी
खुद्द शासकीय वित्तसंस्थांना, भागधारकांना गंडा घालून शेकडो कोटी रुपये लाटण्याच्या जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या घोटाळ्याचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज लाटणाऱ्या, कंपनीचे बोगस रेटिंग वाढवून समभागांची किंमत फुगवणाऱ्या जेनसोलने पुण्याजवळ चाकण औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रिक वाहनाचा बोगस कारखाना उघडून व बोगस ऑर्डर्स दाखवून कोट्यावधींची लूट केली आहे. यात भागधारक आणि कर्मचाऱ्यांना गोत्यात आणले गेले आहे.
गलथान वित्त संस्था, सुस्त नियामक संस्था यांच्यामुळे भामट्यांची चांदी होते, गुंतवणूकदारांची वाट लागते आणि एकूणच उद्योग क्षेत्राची विश्वासार्हता धोक्यात येते, याचे जेनसोल हे जिवंत उदाहरण आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रात होत असलेली भरभराट लक्षात घेऊन अनमोलसिंग जग्गी आणि पुनीतसिंग जग्गी प्रवर्तक असलेल्या जेनसोल इंजीनियरिंगने या कंपनीने बोगस कारखाना, बोगस कागदपत्र, बोगस ऑर्डर्स यांच्या सहाय्याने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थांची खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केली आणि त्यांच्याकडून तब्बल 975 कोटी रुपये लाटले.
जे इंजीनियरिंग कंपनीने चाकण औद्योगिक वसाहतीत आपला इलेक्ट्रिक तीन चाकी वाहने उत्पादनाचा कारखाना असल्याची बतावणी केली. प्रत्यक्षात या कारखान्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी एक रिकामी इमारत आणि काही किरकोळ काम करणारे कामगार आढळून आले. प्रत्यक्षात या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाचा मागमूसही नव्हता.
जेनसोलने उत्पादित करत असलेल्या तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांची तब्बल 30 हजार जणांनी पूर्वनोंदणी केल्याचा आभास कंपनीने निर्माण केला. प्रत्यक्षात एकाही वाहनासाठी पूर्वनोंदणी करण्यात आली नव्हती. केवळ या वाहनाच्या खरेदीत रस असल्याचे 29 हजार जणांनी 'ऑनलाइन' नमूद केले होते. हा आकडा फुगवण्यासाठी कंपनीने एक कुटील डाव खेळला होता. वास्तविक कोणतेही उत्पादक आपल्या उत्पादनाची पूर्वनोंदणी घेताना किमतीच्या किमान दीड टक्के रक्कम आगाऊ जमा करून घेत असते. मात्र, जे आपल्या वाहनांसाठी पूर्वनोंदणी करताना एक रुपया देखील भरण्याची आवश्यकता नाही, असे जाहीर केले होते.
कंपनीच्या या कारस्थानांमुळे प्रत्यक्षात एक पैचा व्यवहार नसताना देखील बोगस कागदपत्र, बोगस नोंदणी यामुळे जेनसोल इंजिनिअरिंगच्या समभागाची किंमत तब्बल 12 पटीने फुगली. विविध वित्तसंस्था आणि शेअर बाजारातून उभ्या केलेल्या निधीचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी करण्याऐवजी कंपनीने त्या पैशातून आलिशान मालमत्ता खरेदी केल्या. शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या समभागाच्या किमती फुगवण्यासाठी हवाला रॅकेटने त्यांना मदत केली.
लेखापरीक्षकांनी बोगस कारखाना आणि ऑर्डर्स याकडे कानाडोळा केला. या सगळ्या घडामोडी घडत असताना सेबी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्यासारख्या नियमक संस्थांनी आवश्यक पावले उचलण्यात अनाकलनीय विलंब केला. या सगळ्या घोटाळ्यात गुंतवणूकदारांचे तब्बल 1 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. कंपनीने नावापुरते का होईना पण कामावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत आणि अशा प्रकारांमुळे उद्योगांची नव्याने उभारणी करू पाहणाऱ्यांकडे सर्रास संशयाच्या नजरेने बघितले जाऊ लागले आहे.