आयपीएलमध्ये संदीप शर्माच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
एका षटकात टाकावे लागले अकरा चेंडू
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राजस्थान रॉयल्सचा द्रुतगती गोलंदाज संदीप शर्मा याच्या नावावर एक अत्यंत लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे. वाईड आणि नो बॉल फेकल्यामुळे त्याला एका षटकात ११ चेंडू टाकण्याची पाळी आली. या षटकात त्याने तब्बल १९ धावा दिल्या.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अरुण जेटली स्टेडियवर दिल्ली कॅपिटल्सबरोबर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या संदीपने तब्बल चार वाईड आणि एका नो बॉलसह ११ चेंडू टाकून १९ धावा दिल्या.
या षटकाची सुरुवातच संदीपने डाव्या यष्टीबाहेर गेलेल्या वाईड चेंडूने केली. त्यानंतर त्याने एक निर्धाव चेंडू टाकला. मात्र, त्यानंतर त्याने सलग तीन चेंडू वाईड टाकले. त्यानंतर एक नो बॉल टाकला. त्याच्या पुढच्या दोन चेंडूवर फलंदाज स्टब्जने चौकार आणि षटकार वसूल केला. पुढच्या दोन चेंडूंवर दोन एकेरी धावा निघाल्या. शेवटच्या चेंडूवर बळी घेण्याची संदीपची संधी महेश तीक्षणाने सोपा झेल सोडून हिरावून घेतली.
आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक ११ चेंडू टाकण्याच्या शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज आणि तुषार देशपांडे यांच्या विक्रमाची बरोबरी संदीप शर्मा याने केली आहे. मात्र, हा विक्रम त्याच्यासाठी अभिमानास्पद नव्हे तर लांछनास्पद असणार आहे.