किया मोटर्सच्या तब्बल नऊशे इंजिनांची चोरी
व्यवस्थापनही चक्रावले आणि पोलिसही
हैदराबाद:: वृत्तसंस्था
पुट्टपुर्थी, सत्य साई जिल्ह्यातील किया कंपनीच्या प्रकल्पातून तब्बल नऊशे इंजिनांची चोरी झाली आहे. या प्रकाराने किया कंपनीचे व्यवस्थापन आणि खुद्द पोलिसही चक्रावले आहेत. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशीला सुरुवात केली आहे.
आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यात किया या मोटार उत्पादक कंपनीचा मोठा जोडणी प्रकल्प आहे. आजूबाजूच्या उद्योगांमध्ये बनलेले सुट्टे भाग जोडून या प्रकल्पात मोटारींचे उत्पादन करण्यात येते. या प्रकल्पातून मोटारीची 900 इंजिने चोरीला गेल्याचे 19 मार्च रोजी व्यवस्थापनाच्या लक्षात आले.
मात्र, सुरुवातीला कंपनीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. कंपनीच्या प्रकल्पात एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करण्यामागे कंपनीच्याच काही आजी-माजी कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा. त्याशिवाय हा प्रकार घडविणे शक्य नाही, अशी कंपनीची खात्री होती. त्यामुळे कंपनीची बदनामी टाळण्यासाठी व्यवस्थापनाने पोलिसांकडे अधिकृत तक्रार करण्याऐवजी त्यांच्याच मदतीने पण खाजगी रीतीने चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अधिकृत तक्रारीचा आग्रह धरल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या चोरी प्रकरणामुळे कंपनीच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि एकूणच व्यवस्थापकीय कारभाराच्या पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. याचा परिणाम केवळ किया कंपनी किंवा ऑटोमोबाईल उद्योगांवरच नव्हे तर एकूणच उद्योग क्षेत्रावर होऊ शकतो. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या चोरी प्रकरणी कसून तपास करण्यास सुरुवात केली आहे.