न्यूयॉर्कमध्ये भीमजयंती दिनी साजरा होणार डॉ. आंबेडकर दिवस
रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महापौर एरिक ॲडम्स यांची घोषणा
न्यूयॉर्क: वृत्तसंस्था
भारतातीलच नव्हे तर जगभरातील उपेक्षित, वंचित घटकांना प्रेरणा देणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस १४ एप्रिल यापुढे दरवर्षी न्यूयॉर्क शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत केली.
महापौरांनी केलेल्या या घोषणेची माहिती न्यूयॉर्कच्या महापौर कार्यालयाचे आंतरराष्ट्रीय व्यवहार उपयुक्त दिलीप चौहान यांनी दिली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ही शिकवण वैश्विकदृष्ट्या मोलाची असल्याचे आवर्जून नमूद केले.
न्यूयॉर्कच्या महापौरांनी केलेली ही घोषणा ऐतिहासिक आहे. त्यांच्या या निर्णयामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि चरित्र जगभरात पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ज्या न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर यांनी उच्चशिक्षण घेतले, तेच न्यूयॉर्क डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीला डॉ. आंबेडकर दिन साजरा करणार आहे, ही बाब उल्लेखनीय आहे, असे आठवले यांनी यावेळी नमूद केले.