सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
व्हॅटिकन सिटी: वृत्तसंस्था
रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या 88 व्या वर्षी न्यूमोनियाने निधन झाल्याचे व्हॅटिकन सिटीकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना ब्रोंकाइटिसचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे जगभरातील कॅथोलिक ख्रिश्चन समाज शोकसागरात बुडाला आहे.
पोप फ्रान्सिस यांना तब्बल 38 दिवसांपासून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया मुळे त्यांची दोन्ही फुफ्फुसे भरून गेली होती. नुकतीच त्यांची रवानगी त्यांच्या कासा सांता मार्टा येथील निवासस्थानी करण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचे निधन झाले.
प्रकृती ठीक नसताना देखील पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर संडे निमित्त सेंट पीटर्स स्क्वेअर या ठिकाणी उपस्थित राहून 35 हजार भाविकांचे अभिवादन स्वीकारले. यावेळी त्यांनी उपस्थित यांना स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचे आवाहन केले. धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरांच्या विचारांचा आदर करणे याशिवाय जगात शांतता प्रस्थापित होणार नाही, असे प्रतिपादन पोप फ्रान्सिस यांनी यावेळी केले.