मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन
गुंतवणूक योजनांद्वारे वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी पाऊल
मुंबई: प्रतिनिधी
विविध गुंतवणूक योजनांद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. फसवणूक होण्यापूर्वीच आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाकडे असणार आहे.
मागील दहा वर्षात तब्बल 51 लाख जणांना गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घालण्यात आला आहे. बोगस गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून तब्बल 15 हजार 500 कोटी रुपयांची लुबाडणूक करण्यात आली आहे. हे वाढते प्रकार लक्षात घेऊन त्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे.
आपल्या परिमंडळाच्या कक्षेत अथवा समाज माध्यमांवर जाहीर होणाऱ्या गुंतवणूक योजनांवर आर्थिक गुप्तवार्ता विभाग लक्ष ठेवून असणार आहे. अशा गुंतवणूक योजनांची माहिती परिमंडळ उपायुक्त आणि आर्थिक गुन्हे विभागाचे सहआयुक्त यांना नियमितपणे देण्याचे काम हा कक्ष करणार आहे. संशयास्पद गुंतवणूक योजनांबाबत काटेकोर माहिती घेऊन आवश्यकता वाटल्यास संबंधितांवर अनियंत्रित ठेव योजना कायदा 2019 नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.
यापूर्वी देखील आर्थिक गुन्हे विभागात गुप्तवार्ता कक्ष अस्तित्वात होते. मात्र, सन 2020 मध्ये या कक्षांवरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे ते बंद करण्यात आले. सध्याच्या काळात विशेषतः गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून फसवणुकीच्या प्रमाणात मोठी वाढ होत असल्यामुळे पुन्हा हे कक्ष कार्यान्वित करण्याचा निर्णय मुंबई पोलीस दलाने घेतला आहे.