हास्य, टाळ्या, स्पर्धा, बक्षिसे आणि स्त्रीशक्तीचा जागर
होम मिनिस्टर कार्यक्रमाने संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप
पुणे: प्रतिनिधी
महिलांची प्रचंड उपस्थिती... हास्याचे धुआंधार कारंजे... टाळ्यांचा कडकडाट... बक्षिसांची लयलूट... अन् महिला शक्तीचा जागर... असे काहीसे चित्र बोपोडीमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात दिसून आले. या कार्यक्रमात सहभागी महिलांनी आपल्या बुद्धिचातुर्याचे, कलाकौशल्याचे आणि हजरजबाबीपणाचे प्रदर्शन करीत बक्षिसे प्राप्त केली. शिवाय लकी ड्राॅच्या माध्यमातून अक्षरशः बक्षिसांची लयलूट करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आल्याचे पहायला मिळाले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे प्रदेश संघटक परशुराम वाडेकर तसेच माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने आयोजित रयतेचे महान छत्रपती शिवाजी महाराज, प्रियदर्शी सम्राट अशोक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वभूषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आठवडावर बोपोडीमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. या उपक्रमाअंतर्गत महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आल. बुद्ध-भीमगीत गायन स्पर्धाही घेण्यात आली. समारोपाच्या दिवशी होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन महिलांसाठी विरंगुळ्याचा सुंदर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष उपस्थिती लाभली. सुरवातीला दोन महिलांना लकी ड्राॅच्या माध्यमातून पैठणी साड्यांचे वाटप आमदार शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत महापुरुषांचे विचार पोहोचवण्याचे काम केले, तसेच होम मिनिस्टर सारख्या कार्यक्रमांद्वारे महिलांसाठी सुंदर असा विरंगुळ्याचा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचे कार्य नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.
परशुराम वाडेकर म्हणाले की, ज्या महामानवांनी समाजाच्या उद्धारासाठी कार्य केले, त्यांचे विचारच समाजाला उन्नतीकडे नेऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या विचारांचा जागर गेल्या आठवडाभरात विविध माध्यमातून करण्यात आला. आपल्या उपक्रमात आमदार शिरोळे हे नेहमीच मदत करीत असल्याचे सांगत त्यांनी आमदार शिरोळे यांचे आभार प्रकट केले. महिलांनाही सामाजिक कार्यात प्रोत्साहन मिळावे, यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वाडेकर यांनी या वेळी सांगितले.
कार्यक्रमात महिलांसाठी तळ्यात मळ्यात, संगीत खुर्चीसारखे खेळ घेण्यात आले. या वेळी महिलांनी घेतलेल्या एकाहून एक सरस उखाण्यांनी उपस्थित महिलांना रिझवले. कार्यक्रमाचे अत्यंत खुमासदार संचालन गणेश रणदिवे यांनी केले, त्यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने महिलांचे जबरदस्त मनोरंजन झाले.
स्पर्धेदरम्यान महिलांचा जल्लोष, हास्याचे कारंजे, टाळ्यांचा कडकडाट असे चित्र दिसून आले. या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना टीव्ही. फ्रीज, वाॅशिंग मशीन, गॅस शेगडी, कुलर यासह विविध प्रकारच्या बक्षिसांची अक्षरशः लयलूट करण्यात आली.