पुणे : कुणाच्याही पदार्थाची किंवा नावची नक्कल करून व्यवसाय करण्याचा आमच्या अशिलाचा हेतू नाही. बाकरवडीच्या पाकिटावर प्रिंटरच्या चुकीमुळे नाव आणि ग्राहकक्रमांक छापला गेला. ही चूक आमच्या लक्षात आल्यानंतर ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून तसा खुला वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. आमचे अशील असलेले चितळे स्वीट होमचे संचालक सचोटीने व्यवसाय करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती ॲड. हेमंत झंझाड, ॲड. नितीन झंझाड यांनी केली.
चितळे स्वीट होमचे संचालक प्रमोद चितळे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात त्यांची बाजू मांडण्यासाठी ॲड. झंझाड यांनी आज पत्रकार परिषदेत उपयोक्त खुलासा केला. चतळे स्वीट होमचे संचालक प्रमोद चितळे, ॲड. हेमंत झंझाड, व्यावसायिक व वित्तीय सल्लागार लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकारांची संवाद साधला. ॲड. राजेश उपाध्याय, राजीवन नंबियार उपस्थित होते.
ॲड. झंझाड म्हणाले, बाकरवडी हा एक पदार्थ आहे. या पदार्थाचे उत्पादन कुणीही करू शकते. बाकरवडीच्या उत्पादनाचा कुणी पेटंट घेतलेला नाहीये. पुण्यातील सदाशिव पेठेत 1954 साली कै. सखाराम गोविंद चितळे यांनी चितळे स्वीट होमची स्थापना केली. त्यानंतर कै. प्रभाकर सखाराम चितळे यांनी चितळे स्वीट होम हा व्यवसाय 1997 पर्यंत चालू ठेवला. सध्या प्रमोद चितळे व कुटंबिय हा व्यवसाय चालवीत आहे.
प्रमोद प्रभाकर चितळे म्हणाले, ज्या वास्तूत व्यवसाय सुरू झाला त्याच वास्तूत आजअखेर व्यवसाय चालू आहे. चितळे स्वीट होम या नावानेच पुणे महानगरपालिका विभागात सुरुवातीपासूनच नोंद आहे. त्याचप्रमाणे चितळे स्वीट होम या नावानेच शॉप ॲक्टची नोंदणी देखील 1984च्या आधीपासून झाली आहे.
अल्पावधीतच उत्तम चव आणि गुणवत्तेमुळे आम्ही तयार करीत असलेली बाकरवडी पुणेकरांमध्ये लोकप्रिय झाली. पुणेकरांच्या मागणीमुळेच पुणे आणि परिसरातील अनेक दुकानदारांकडून आमच्या बाकरवडी मागणी वाढू लागली. त्यातून पुण्यातील अनेक दुकानदारांना आम्ही चितळे स्वीट होम या नावाने उत्पादित करीत असलेल्या बाकरवडीचा पुरवठा करण्यात येत आहे. या उत्पादनासाठी आम्ही 2010 या वर्षात ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला आहे व बाकरवडीची विक्री करत आहोत.
लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, कुणाची नक्कल करून व्यवसाय करण्याचा आमचा उद्देश नाही. बाकरवडी हा पदार्थ राजस्थान, गुजराथ आणि महाराष्ट्रात बनविला जातो. पुण्यात 100 स्वीट होम बाकरवडी बनवतात. अशा सगळ्यांवर तुम्ही बंदी आणणार का? आमचा कुणालाही फसविण्याचा विचार नाही.
बंदीचा आदेश नाही : ॲड. हेमंत झंझाड
प्रमोद चितळे आणि कुटुंबिय उत्पादन आणि विक्री अतिशय योग्य पद्धतीने करत असल्याने ते बंद करण्याचा कोणताही आदेश मा.न्यायालयाने दिलेला नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ॲड. हेमंत झंडाड यांनी सांगितले.
व्यवसायात प्रामाणिकपणा : प्रमोद चितळे
आजोबांनी सुमारे 75 वर्षांपूर्वी सुरू केलेला व्यवसाय चितळे कुटुंबियांनी प्रामाणिकपणे सुरू ठेवला आहे. आजोबांनंतर वडिल आणि वडिलांनंतर मी व्यवसायातील प्रामाणिकपणा जपत वाटचाल करीत आहे. व्यवसायातील प्रामाणिकपणाला पुणेकरांनीही कायम साथ दिली आहे.
000