'... ही दोन धर्मांची नव्हे तर धर्म आणि अधर्माची लढाई'
दहशतवादी हल्ल्याबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांची भूमिका
मुंबई: प्रतिनिधी
दहशतवादाच्या विरोधातील लढाई ही दोन धर्मांची लढाई नाही, तर धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे, अशा शब्दात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
पंडीत दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळ्यात भागवत बोलत होते. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार केला. भारतीय सैनिक किंवा नागरीक असे कृत्य करणे शक्य नाही. हिंदू कधीही असे करणार नाही, असा दावा त्यांनी केला.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रत्येकाने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी कोणी जाती-धर्माचा विचार केला नाही. हीच स्थिती कायम राहिली तर कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. कोणी तसा प्रयत्न केलाच तर नजर फुटल्याशिवाय राहणार नाही, असेही सरसंघचालक म्हणाले.
आपण प्रत्येकामध्ये चांगले बघणारे लोक आहोत. एक काळ असा होत की जेव्हा आपल्याला सैन्याची आवश्यकता वाटत नव्हती. मात्र, सन 1962 मध्ये आपल्याला चांगलाच धडा मिळाला. तेव्हापासून आपण आपल्या सैन्याची ताकद वाढवत आहोत. दुष्टांचा नाश झालाच पाहिजे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात संताप तर आहेच. त्याशिवाय याला कारणीभूत असलेल्यांना अद्दल घडवण्याची अपेक्षाही आहे. ही अपेक्षा पूर्ण होईल अशी आशा करूया, असेही भागवत यांनी नमूद केले.
प्रत्येकाने संघातच असले पाहिजे असे नाही
यावेळी कलेच्या क्षेत्रात मंगेश कर कुटुंबीयांनी दिलेल्या योगदानाबद्दल सरसंघचालकांनी त्यांचे कौतुक केले. कलेच्या माध्यमातून त्यांनी देशसेवा केलीच. शिवाय त्यांच्यात प्रखर देशप्रेम होते. प्रत्येकाने आपल्या परीने प्रामाणिकपणे आणि नि:स्वार्थीपणे देशसेवा करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात किंवा राष्ट्रीय पक्षात जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे जे काही आहे, त्यातून प्रत्येकाने देशाची सेवा केली पाहिजे, असेही भागवत म्हणाले.