'पाकिस्तानला भारताकडून दिले जाईल सडेतोड उत्तर'

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विश्वास 

'पाकिस्तानला भारताकडून दिले जाईल सडेतोड उत्तर'

पुणे: प्रतिनिधी 
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर दिले जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला. 

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या पुणेकर नागरिकांच्या कुटुंबाची भेट घेऊन मानकर यांनी त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी आपण तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पाकिस्तान सातत्याने भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत. पाकिस्तानच्या नापाक कारवायांना त्यांना समजेल अशा भाषेतच निश्चितपणे उत्तर दिले जाईल. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थ असून संपूर्ण देश एकोप्याने त्यांच्या पाठीशी उभा आहे, अशी ग्वाही मानकर यांनी दिली. 

दहशतवादाला कोणताही जात, धर्म नसतो. मात्र, पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी नावे विचारून एकेका पर्यटकावर गोळीबार केला आहे. या हल्ल्याला कारणीभूत असलेल्या कोणालाही भारतीय सैन्य सोडणार नाही. भारत हा वीरांचा देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या वीरांची आपली परंपरा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारत पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा  '... ही दोन धर्मांची नव्हे तर धर्म आणि अधर्माची लढाई'

या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानबरोबर यापूर्वी झालेल्या कोणत्याही संघर्षात भारताकडून सिंधू जल कराराचे उल्लंघन कधीही करण्यात आलेले नव्हते. मात्र, दहशतवादाला पुसण्याचे उद्योग पाकिस्तान बंद करीत नसल्यामुळे हा करार स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानभोवती फास आवळण्याचा देशाच्या नेतृत्वाचा निर्धार दिसून येत आहे, असेही मानकर म्हणाले.

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

Advt